नागमंगला येथे गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकी दरम्यान दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीविषयी प्रक्षोभक वक्तव्य केल्या प्रकरणी केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री शोभा करंदलाजे आणि कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्यावर नागमंगला पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, भाजप आमदार मुनिरथना आणि इतर सहा जणांविरुद्ध कर्नाटक पोलिसांनी बलात्कार, लैंगिक छळ आणि गुन्हेगारी धमकीचा गुन्हा दाखल केला आहे.
करंदलाजे यांना ऑनलाईन पोस्ट भोवली
13 सप्टेंबर रोजी केलेल्या एका ऑनलाईन पोस्टमध्ये करंदलाजे यांनी प्रथमपूज्य गणेशाला पोलिसांनी मंड्या, कर्नाटक येथे अटक केली आहे! मिरवणुकी दरम्यान राष्ट्रविरोधी लोकांनी गणेशमूर्तीवर दगड, चप्पल फेकले आणि 25हून अधिक दुकाने जाळली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, गृहमंत्री परमेश्वर दोषींना संरक्षण देत आहेत आणि घटनेवर पांघरुण घालत आहेत, असे म्हटले होते.
केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टूही अडकले
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे नंबर एकचे दहशतवादी असल्याचे कथित वक्तव्य रविवारी करणारे केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांच्याविरुद्धही कर्नाटकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसने बिट्टू ‘मूर्ख माणसासारखे’ बोलत असल्याचे म्हटले होते.