खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नूच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी येथील जिल्हा न्यायालयाने हिंदुस्थानचे केंद्र सरकार, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, रॉ गुप्तचर संस्थेचे माजी अध्यक्ष सामंत गोयल, रॉचे एजंट विक्रम यादव आणि अमेरिकास्थित भारतीय व्यापारी निखिल गुप्ता यांना समन्स बजावले आहे.
न्यूयॉर्क येथील जिल्हा न्यायालयात पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाबद्दल दिवाणी खटल्याची सुनावणी सुरू आहे. या खटल्यातही समन्स काढण्यात आले असून, कोर्टाने 21 दिवसांमध्ये या समन्सला उत्तर देण्यास सांगितले आहे. अमेरिकेसारख्या मित्रराष्ट्रातील एखाद्या कोर्टाने हिंदुस्थानी गुप्तचर यंत्रणांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना समन्स पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
अमेरिकेशी मित्रत्त्वाचे संबंध असल्याची टिमकी वाजवणाऱ्या केंद्र सरकारची बोलती या समन्समुळे बंद झाली आहे. भारत सरकारला पाठवलेले समन्स ‘पूर्णपणे अनुचित’ असल्याची गुळमुळीत प्रतिक्रिया परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी आज या घडामोडींवर दिली. हिंदुस्थान या प्रकरणाची चौकशी करत आहे, परंतु उभय देशांच्या विस्तारणाऱ्या परस्पर संबंधांवर याचा परिणाम होणार नाही, असे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी मे महिन्यात म्हटले होते.
पन्नूवर टीका
पन्नूला 2020 मध्ये दहशतवादी म्हणून हिंदुस्थानने घोषित केले आहे. तो शिख्स फॉर जस्टिस या जहाल संघटनेचा प्रमुख असून भारतीय नेते आणि संस्थांविरुद्ध भडकावणारी भाषणे आणि धमक्या देण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. या कटाच्या प्रकरणी आमची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे, असे मिसरी यांनी सांगितले.
काय आहे खटला
अमेरिका आणि कॅनडाचे दुहेरी नागरिकत्व असलेल्या पन्नूच्या हत्येचा कट अमेरिकेने हाणून पाडल्याचे वृत्त ब्रिटनमधील फायनान्शिअल टाइम्सने नोव्हेंबरमध्ये दिले होते. जो बायडेन प्रशासनातील अधिकाऱ्यांनी नंतर याला दुजोरा दिला. या कटप्रकरणी अमेरिकेने ताब्यात घेतलेल्या एका हिंदुस्थानी व्यक्तीविरुद्ध अमेरिकन न्यायालयात खटला दाखल करण्यात आला असून, एका हिंदुस्थानी अधिकाऱयाचेही त्यात कथितरीत्या नाव जोडले गेले आहे, ही चिंतेची बाब आहे, असे तत्कालीन प्रवत्ते अरिंदम बागची यांनी सांगितले होते.