अंधेरीतील बंगल्यात आग
अंधेरी पश्चिम लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथे एकमजली बंगल्यात गुरुवारी सकाळच्या सुमारास अचानकपणे आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाने आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने धोका टळला. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. पश्चिम उपनगरातील अंधेरी (पश्चिम), लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथे तळमजला अधिक एकमजली बंगल्यात गुरुवारी सकाळी 8.45 वाजताच्या सुमारास अचानकपणे आग लागल्याची घटना घडली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अग्निशमन दलाला माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य हाती घेतले. अथक प्रयत्नानंतर तब्बल अडीच तासांनंतर सकाळी 11.25 वाजता आगीवर नियंत्रणात मिळवण्यात यश आले.
बाल्कनीचा भाग कोसळून पाच महिला जखमी
खार पूर्व येथे एक मजली इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग दुसऱ्या घरावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच महिला जखमी झाल्या. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली. खार पूर्वेला शांतीलाल कंपाऊंड, गोळीबार रोड येथे एका एक मजली इमारतीच्या बाल्कनीचा भाग मध्यरात्री 12.30 च्या दरम्यान बाजूच्या दुसऱ्या घरावर कोसळून पाच महिला जखमी झाल्या. जखमींना तत्काळ वांद्रे येथील भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी पूनम जयस्वाल (22) यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर जयस्वाल कुटुंबातील अन्य चार महिलांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण विभागाकडून देण्यात आली.
‘राँग नंबर’चे स्क्रिनिंग
इस्लामविषयी गैरसमजुती दूर करून लोकांपर्यंत सत्य माहिती पोहोचविण्यासाठी इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरतर्फे 1800 572 3000 या टोल फ्री क्रमांकाची हेल्पलाईन उपलब्ध आहे. त्याच्या प्रसिद्धीसाठी आज हैदराबादच्या इस्लामिक सेंटरमध्ये ‘राँग नंबर’ या मराठी लघुपट लाँच करण्यात आला. जमाअत ए इस्लामी हिंदचे केंद्रीय संचालक मौलाना इकबाल मुल्ला यांच्या उपस्थितीत लघुपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले. आठ भाषांत ही हेल्पलाइन सुरू असून त्याविषयी माहिती देणारा हा लघुपट आहे. सहेर फिल्मद्वारे दिग्दर्शित या लघुपटाचे छायाचित्रण अयाज खान यांनी केले आहे.
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचे दिवे
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वैद्यकीय, दंत, होमिओपॅथी आणि आयुर्वेद रुग्णालयातील विजेचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. तो कमी करण्यासाठी रुग्णालयात बीओटी तत्त्वावर सोलार यंत्रणा बसविण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाची राज्यात 25 वैद्यकीय, तीन दंत, सहा आयुर्वेद आणि एक होमिओपॅथी कॉलेज आहे. या महाविद्यालयांना मोठ्या प्रमाणावर विजेचा खर्च येतो. हा खर्च कमी करण्यासाठी रुग्णालयाच्या इमारतीच्या गच्चीवर सौर ऊर्जा यंत्रणा बसविण्यात येणार आहे. प्रकल्प राबविताना शासनावर आर्थिक भार येणार नाही.
शिवसेनेचे माजी नगरसेवक विक्रम मोरे यांचे निधन
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे चंदनवाडी परिसरातील विभागप्रमुख व माजी नगरसेवक विक्रम मोरे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे कट्टर शिवसैनिक तसेच शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान देणारा कार्यकर्ता हरपला आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः ठाण्यातील पहिले विभागप्रमुख म्हणून विक्रम मोरे यांची नियुक्ती केली होती. खोपट परिसरात ते अनेक वर्षे कार्यरत होते. ठाण्यात शिवसेना रुजवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. नगरसेवक म्हणून मोरे यांनी सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न सोडवले. परिवहनचे सदस्य म्हणूनही त्यांनी लक्षणीय काम केले. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सहभाग आहे. विक्रम मोरे यांच्या पश्चात पत्नी तसेच दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. जवाहरबाग स्मशानभूमीत मोरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
उदय पाटील यांचे निधन
भाईंदर पूर्वमधील वृत्तपत्र विक्रेते उदय पाटील यांचे बुधवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 48 वर्षांचे होते. भाईंदर वृत्तपत्र विक्रेता संघ आणि सर्व वृत्तपत्र वितरण विभाग अधिकारी यांनी उदय पाटील यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
शेवंताबाई आनंदे यांचे निधन
पुणे जिल्हा अखिल महाराष्ट्र सुतार समाज महासंघाचे माजी अध्यक्ष दिलीपराव आनंदे यांच्या मातोश्री ग.भा. शेवंताबाई वामनराव आनंदे वय 98 यांचे अलीकडेच कान्हे ता. मावळ येथे आकस्मात निधन झाले. त्यांच्या पश्चात दिलीपराव, अशोक, नवनाथ व संतोष ही मुले तर शोभा अशोक टकले, प्रमिला लालाजी टकले या कन्या आहेत. शेवंताबाई यांचा दशक्रिया विधी बुधवार 25 सप्टेंबर रोजी सकाळी 8-30 वा. खापरेओढा- कान्हे येथे होईल.
गुवाहाटीत पळून आलेल्या आमदाराला मिंधेंची नो एंट्री!
सूरतमार्गे गुवाहाटीला पळून गेलेल्या आमदारांपैकी नरेंद्र भोंडेकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नो एंट्री केली. नागपुरातील रामगिरी शासकीय निवासस्थानी भोंडेकर मिंधेंना भेटण्यासाठी गेले असता त्यांना प्रवेश देण्यात आला नाही. मिंधेंच्या आदेशावरून रामगिरीचे गेट बंद करण्यात आले. त्यामुळे भोंडेकर यांना माघारी परतले व भंडाऱ्याला निघून गेले. भोंडेकर हे मिंधे समर्थक अपक्ष आमदार आहेत. मिंध्यांच्या पलायनावेळी तेही सूरतमार्गे गुवाहाटीला पळून गेले होते.
पूजा खेडकरकडे मागितला दिल्ली हायकोर्टाने खुलासा
माजी आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरने यांनी आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी असत्य विधाने करून खोटी माहिती दिली. या यूपीएससीच्या आरोपावर दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी दिल्ली हायकोर्टाने तिचे उत्तर मागवले आहे. या प्रकरणी तिने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. न्या. सुब्रमण्यम प्रसाद यांनी तिला आयोगाच्या आरोपावर उत्तर दाखल करण्यास सांगितले. या प्रकरणी पुढील सुनावणी 26 सप्टेंबर रोजी होणार आहे. नागरी सेवा परीक्षेत ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा लाभ चुकीच्या पद्धतीने मिळवून फसवणूक केल्याचा आरोप खेडकर यांच्यावर आहे. तिने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
राहुल गांधींच्या खटल्याची सुनावणी 21 सप्टेंबरला
येथील खासदार-आमदार न्यायालयात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल मानहानीच्या खटल्याची सुनावणी तक्रारदाराच्या वकीलाच्या अनुपलब्धतेमुळे गुरुवारी 21 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. 2018 च्या कर्नाटक निवडणुकीत प्रचारादरम्यान भाजपचे तत्कालीन अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप भाजपचे स्थानिक नेते विजय वर्मा यांनी केला आहे.