राज्य बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी ‘आजीवन पेन्शन योजना’, निवृत्तीनंतर दरमहा 10 हजार रुपये मिळणार

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची 113 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयातील सहकार सभागृहात गुरुवारी पार पडली. या सभेमध्ये देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी ‘आजीवन पेन्शन योजना’ जाहीर करण्यात आली. या योजनेअंतर्गत सध्या कार्यरत असलेल्या 507 कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर दरमहा दहा हजार रुपये इतकी रक्कम त्यांच्या उदरनिर्वाहकरिता आजीवन मिळणार आहे.

विशेष म्हणजे, या योजनेसाठी लागणारी सर्व गुतंवणूक बँकेने केली आहे. या योजनेस बँक कर्मचारी संघटनेचे निवृत्त संघटक सचिव धर्मराज मुंडे यांचे नाव दिल्याबद्दल तमाम कर्मचाऱ्यांकडून प्रशासक विद्याधर अनास्कर यांचे कौतुक होत आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 31 मार्च 2024 अखेरीस बँकेच्या सांपत्तिक स्थितीचा आढावा घेत, बँकेच्या प्रगतीचे निकष सभासदांना अवगत करण्यात आले. या सभेत विद्याधर अनास्कर यांनी बँकेची धोरणे व प्रत्येक निर्णयामागील प्रशासनाचा व्यावसायिक हेतू उपस्थितांना समजावून सांगितला. बँकिंग व्यवहारात बँकेचा पाया मजबूत असणे अत्यंत आवश्यक असते.

31 मार्चअखेर राज्य बँकेचे नक्त मूल्य 4618 कोटी रुपये असून गतवर्षीच्या तुलनेत त्यामध्ये 809 कोटी रुपयांची भरीव वाढ झाली. राज्य बँकेचे नक्त मूल्य आजमितीस देशातील सर्व सहकारी बँकांमध्ये जास्त आहे. या सभेला व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे, सरव्यवस्थापक अनंत भुईभार उपस्थित होते.

6530 कोटींचा स्वनिधी

बँकेची वैधानिक गंगाजळी व भाग भांडवल मिळून 31 मार्चअखेर बँकेचा स्वनिधी 6530 कोटी रुपये इतका झाला आहे. रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार बँकांना भांडवल पर्याप्तता प्रमाण किमान 9 टक्के राखणे आवश्यक आहे. राज्य बँकेने मात्र हे प्रमाण 16.34 टक्के इतके राखल्याने राज्य बँकेची नफा क्षमता वाढल्याचे दिसून येते. भांडवल पर्याप्तता प्रमाण तपासत असताना बँकेच्या कर्ज वाटपाचे प्रमाण (सीडी रेशो) तपासणे आवश्यक असते.

57265 कोटींचा उच्चांकी व्यवहार

राज्य बँकेने दिलेली कर्जे 33681.71 कोटी असून, त्यामध्ये गतवर्षीपेक्षा 7231.66 इतकी भरीव कोटी रुपयांची वाढ झाली. बँकेच्या ठेवीमध्ये बँकेने 4969.37 कोटींनी वाढ झाली आहे. यामुळे बँकेच्या एकूण व्यवहारात गतवर्षीपेक्षा तब्बल 12201 कोटीने वाढ होऊन बँकेचा एकूण व्यवहार 57265 कोटी इतका झाला.