डिलिव्हरीसाठी आला आणि तुरुंगात गेला

सायबर ठगांना फसवणुकीच्या गुह्यात बँक खाती आणि सिमकार्ड पुरवणाऱ्याला वांद्रे पोलिसांनी अटक केली. गुलाम सरदार असे त्याचे नाव आहे. बँक खाती आणि सिमकार्ड डिलिव्हरीच्या मोबदल्यात त्याला 12 हजार रुपये मिळत होते. त्याच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

वांद्रे येथे ज्येष्ठ नागरिक महिला राहतात. 30 ऑगस्टला त्या घरी होत्या. तेव्हा त्यांना मोबाईलवर मेसेज आले. कोणतेही व्यवहार न करता दोन्ही बँक खात्यातून 1 लाख 42 हजार रुपये गेल्याने त्यांना धक्काच बसला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मराठे यांच्या पथकातील उपनिरीक्षक शंकर पाटील आदी पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना एका बँक खात्याची माहिती मिळाली. त्या माहितीवरून पोलीस एका व्यक्तीपर्यंत पोहचले. त्याची चौकशी केली. त्याच्या चौकशीत गुलामचे नाव समोर आले.

गुलाम हा गोवंडी परिसरात बँक खाती घेण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीनंतर पोलिसांनी तेथे सापळा रचला. सापळा रचून पोलिसांनी गुलामला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 17 सिमकार्ड आणि दोन मोबाईल हस्तगत केले आहेत. गुलामला अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.