दादा वैतागले; वेडेवाकडे बोलू नका, संजय गायकवाड आणि बोंडेना झापले

महायुतीच्या वाचाळवीरांकडून सातत्याने होत असलेल्या वादग्रस्त विधानांमुळे अजितदादा चांगलेच वैतागले आहेत. सत्ताधारी पक्षाच्या कोणत्याही नेत्याने वेडेवाकडे बोलून घटकपक्षांना अडचणीत आणण्याचे काम करू नये. बोलताना मर्यादा पाळा, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांना आज चांगलेच झापले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांचे अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमक्षच भरसभेत कान टोचले. संविधानानुसार प्रत्येकाला आपापली मते व विचार मांडण्याचा अधिकार आहे; पण सत्ताधारी पक्षाच्या कोणत्याही नेत्याने वेडेवाकडे बोलून महायुतीच्या घटकपक्षांना अडचणीत आणण्याचे काम करू नये, असे खडे बोल महायुतीच्या वाचाळवीरांना सुनावले.

बोलताना अनेक प्रकारचे शब्दप्रयोग करता येतात. त्यामुळे महायुतीचे सरकार त्या विचारांचे आहे. जर कुणी एखाद दुसरे काही बोलून गेले तर त्याला महायुती सरकारचा पाठिंबा आहे असे समजण्याचे कारण नाही हेदेखील मी जाहीरपणे सांगू इच्छितो, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसने दाखवले काळे झेंडे, पोलिसांशी झटापट

वाचाळ आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. मुख्यमंत्री येण्यापूर्वीच पोलिसांनी दडपशाही करून प्रदेश सचिव जयश्री शेळके, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना ताब्यात घेतले. त्यानंतर माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

पोलिसांचा दबाव झुगारून बोंद्रे यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी बोंद्रे यांना उचलले. पोलिसांची नजर चुकवून माजी नगरसेवक बबलू कुरेशी, जाकीर कुरेशी, मोहंमद सोफियान आदींनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करून काळे झेंडे दाखवले. 250 शेतकऱ्यांनी आपल्या रक्ताने सह्या केलेले निवेदन पोलिसांशी झालेल्या झटापटीत फाटले.