महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जवळ येऊ लागताच महायुतीत जागावाटपावरून संघर्ष सुरु झाला आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतरही भाजप 160 जागा लढण्यावर ठाम आहे. मिंधे गटाने 120 ते 128 जागांवर दावा केला आहे. तर अजितदादा गट 70 जागांसाठी आग्रही असल्याचे समजते. जागावाटपावरून महायुतीत असलेली धुसफुस अधिक वाढू नये यासाठी भाजपच्या केंद्रातील वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत.
लोकसभेच जागावाटप करताना भाजपने निवडणुकीआधी केलेल्या सर्व्हेचा आधार घेत सर्वाधिक जागा पदारात पाडून घेतल्या होत्या. मात्र, विधानसभा निवडणुकीत भाजपला वरचढ होऊ द्यायचे नाही, अशी भूमिका मिंधे आणि अजितदादा गटाने घेतली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीतील स्ट्राईक रेटनुसार जागा वाटप करावे, अशी मागणी केली आहे. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजयाची शक्यता हाच जागावाटपाचा फॉर्म्युला राहणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे महायुतीत सारेकाही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे.
अजित पवारांना 50 पेक्षा अधिक जागा देण्यास विरोध
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार घेऊन महायुतीत सहभागी झाले आहेत. मात्र, त्यांचा लोकसभेला महायुतीला काहीच फायदा झाला नाही. यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत बहुतांश ठिकाणी भाजपची खरी लढत ही राष्ट्रवादीसोबत झाली होती. त्यामुळे 50 ते 60 पेक्षा अधिक जागा अजित पवार गटाला देण्यास भाजपचा विरोध आहे.
मिंध्यांचा घटक पक्षांच्या जागांवरच दावा
शिवसेनेशी गद्दारी करून मिंधे गटात आलेल्या आमदारांच्या जागांबरोबर महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भाजप आणि अजित पवार गटाकडील काही जागांवर मिंध्यांनी दावा केला आहे. यामुळे महायुतीतील जागावाटपाचा पेच वाढला आहे. ठाणे, नाशिकमधील निम्म्यापेक्षा जास्त जागांसाठी मिंधे गट आग्रही आहे.
मित्र पक्षांची वेगळी चूल
महायुतीचे मित्र पक्ष असणाऱ्या आमदारांकडे महायुतीच्या नेत्यांचे फारसे लक्ष नाही. त्यामुळे त्यांनी आपली वेगळी चूल मांडली आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चार जागांवर दावा केला असून कोल्हापूर जिह्यात दोन ठिकाणी उमेदवार थेट जाहीर केले आहेत. इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली असली, तरी त्यांनी आपल्या मुलाला ताराराणी आघाडीकडून तर हातकणंगलेमधून जयश्री कुरणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शाहू विकास आघाडीला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे शिरोळमधून याच पक्षाच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात असतील असे चित्र आहे.
एकजूट असल्याचे फक्त चित्र
महायुतीच्या नेत्यांनी संयम ठेवावा आणि एकजूट असल्याचे चित्र जनतेसमोर जाईल, याची काळजी घ्यावी. काही निकषांच्या आधारे जागावाटप करावे, जिंकून येण्याची क्षमता असलेले योग्य उमेदवार निश्चित करावेत, अशा सूचना पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महायुतीत जागावाटपावरून सुरू असलेल्या धुसफुसीच्या पार्श्वभूमीवर दिल्या आहेत.
120 जागांवर रस्सीखेच
ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाची जागा या सुत्रानुसार जागावाटपाची प्राथमिक चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. 288 जागांचा विचार करता विधानसभेच्या 120 जागांवर महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. लोकसभेप्रमाणे मतदारसंघातील अँटी इन्कम्बन्सीचा फटका विधानसभेला बसू नये यासाठी महायुतीच्या घटक पक्षांकडे असलेल्या काही जागांची अदलाबदल केली जाण्याची शक्यता आहे.