पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटानंतर इस्रायल आता मोठ्या हल्ल्याच्या तयारीत, अमेरिका 50 हजार नागरिकांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात

लेबनॉनमधील पेजर स्फोट आणि हिजबुल्लाने इस्रायली पोस्टवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिका सावध झाली आहे. यानंतर आपल्या 50 हजार नागरिकांना लेबनॉनमधून सायप्रसला हलवण्यासाठी अमेरिका प्रयत्न करत आहे. इस्त्रायल लेबनॉनमध्ये युद्ध करण्याच्या तयारीत असल्याची भीती अमेरिकेने व्यक्त केली आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत इस्रायल लवकरच आक्रमण करू शकते, अशी चिंता व्यक्त केली आहे.

एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायलने देशाच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे हजारो विशेष दल आणि पॅराट्रूपर्सची लष्करी तुकडी तैनात केली आहे. हे सैनिक अनेक महिन्यांपासून गाझा पट्टीत लढत होते, असे अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने आपल्या अहवालात म्हटले आहे.

लेबनॉनमधील विमानतळांवर पेजर्सवर बंदी

लेबनॉनमध्ये पेजर आणि वॉकी-टॉकीद्वारे झालेल्या स्फोटांमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला तर हजारो लोक जखमी झाले. या घटनांनंतर, लेबनॉनची राजधानी बेरूतमधील रफिक हरिरी विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या सर्व फ्लाइट्सवर पेजर आणि वॉकी-टॉकी वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.

पेजर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे स्पष्टीकरण

लेबनॉनमध्ये पेजरमध्ये स्फोट झाल्यानंतर पेजर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. स्फोट झालेल्या पेजरचे मॉडेल गेल्या दहा वर्षांपासून तयार करण्यात आलेले नाहीत, असे पेजरची निर्मिती करणाऱ्या जपानी कंपनी आयकॉमने म्हटले आहे. IC-V82 मॉडेल 2004 ते 2014 दरम्यान मध्य पूर्व देशांमध्ये निर्यात करण्यात आले. मात्र 2014 पासून त्यांची निर्यात थांबली असून उत्पादनही बंद झाले आहे, असे कंपनीने स्पष्ट केले.