एकीकडे लाडकी बहीण योजनेचा गाजावाजा करणार्या मिंधे सरकारमधील आमदार संजय गायकवाड यांनी एका महिलेची जमीन हडपल्याचे समोर आले आहे. सदर प्रकारचे आरोप करीत महिलेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमानंतर मला माझी जमीन परत करा व न्याय मिळवून द्या असे बॅनर भर कार्यक्रमात झळकवले तसेच काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला.
मोताळा येथे रिता उपाध्ये या महिलेची गट नंबर 62 मध्ये दीड एकर जमीन आहे. ही जमीन आमदार संजय गायकवाड यांनी बळकावली असल्याचा महिलेने आरोप केला. 2021 पासून आमदार गायकवाड यांनी जबरदस्तीने व बेकायदेशीरपणे सदर जमीन ताब्यात घेत त्यातील मुरूम उत्खनन केले व त्यावर फार्म हाऊस बनविले. दिपाली चौबे या महिलेसोबत संगनमताने आमदारांनी ही जमीन हडपली. दरम्यान या प्रकरणी सदर महिला सर्व पुरावे घेऊन न्यायालयात गेली असून न्यायालयाने बुलढाणा आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल देण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत पोलिसांकडून 28 फेब्रुवारीला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पीडित महिलेने आज न्याय मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या बुलढाणा येथील लाडकी बहीण कार्यक्रमानंतर बॅनर झळकवून व काळे झेंडे दाखवून ‘आपल्याच पक्षाचे नेते जर असा अन्याय अत्याचार करत असतील तर महिलांचे काय होणार?’ असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. त्यामुळे कार्यक्रमात एकच खळबळ माजली. फक्त स्वार्थासाठी लाडकी बहीण आहे हे या सरकारच्या व आमदारांच्या कृतीवरुन सिद्ध होते असे रिता उपाध्ये म्हणाल्या.