Dapoli News – मंडणगड रस्त्याची साईट पट्टी खचली, वाहतुकीस धोका

मंडणगड शहरातून पुढे बाणकोट वेळासकडे जाणाऱ्या मार्गाची मंडणगड शहराच्या हद्दीतच रस्त्याची एक बाजु खचली आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोक्याची झाली आहे.

मंडणगड तालुका मुख्यालय असलेल्या मंडणगड शहातून पुढे देव्हारे, बाणकोट, वेळास या मंडणगड तालुक्यातील महत्त्वाच्या मार्गावरील गावात जाणाऱ्या मार्गासह दापोली तालुक्यातील मांदिवली, केळशी, उटंबर, आडे तसेच मंडणगड पालवणी मार्गे कादीवली, कुडावळे, दापोली येथे जाणाऱ्या मार्गाची मंडणगड शहराच्या हद्दीतच रस्त्याची एक बाजू खचत चालली आहे. वाहतूकीच्या दृष्टीने अतीशय महत्त्वाचा असलेल्या या मार्गावरील धोक्याचे ठिकाण लक्षात यावे यासाठी येथे कोणत्याही प्रकारचे धोका आहे हे दर्शविण्यासाठी वाहनाची गती कमी करा पुढे धोका आहे अशाप्रकारचा दिशादर्शक नामफलक लावलेला नाही. या मार्गावरील भरधाव वेगाने जाणारी वाहने लक्षात घेऊन रस्ता सुधारणे आधी किमान दिशादर्शक नामफलक लावणे गरजेचे आहे तीसुद्धा तसदी घेण्यात येत नाही त्यामुळे सुरक्षित प्रवास धोक्याचा झाला आहे.

खचलेल्या ठिकाणाचा मार्ग हा मंडणगड शहरात नेमका वर्दळीच्या ठिकाणी असतानाही या ही महत्त्वाची समस्या सोडविण्यासाठीची प्रशासनाची दिरंगाई एखाद्याच्या जीवावर बेतणारी आहे. जर शहरात ही परिस्थिती असेल तर मग ग्रामीण भागातील रस्त्याच्या दुरवस्थेंचा विचारच न केलेला बरा. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी एकदा संयुक्तपणे मंडणगड तालुक्यातील सर्वच रस्त्यांची पाहणी करून दुरवस्था पाहून घ्यावी त्यानंतर मार्गावरील वाहनांची वर्दळ तसेच प्रवासी आणि व्यावसायिक दृष्टया महत्त्वाचे कोणते रस्ते खराब झालेले आहेत त्या त्या रस्त्यांची उपयोगिता लक्षात घेऊन प्राधान्य क्रमाने आवश्यक त्या रस्त्यांच्या सुधारणा करावी अशी मागणी होत आहे.