
प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक ( कोरिओग्राफर ) शेख जानी बाशा म्हणजेच जानी मास्टर याच्यावर 21 वर्षीय तरुणीने लैंगिक छळाचा आरोप केला होता. आता या प्रकरणी जानी मास्टर याला अटक करण्यात आली आहे. त्याला सायबराबाद पोलिसांनी अटक केली आहे. आता त्याला दिवाणी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. न्यायालयातून ट्रांझिट वॉरंट मिळाल्यानंतर त्याला हैदराबादला नेण्यात येणार आहे.
जानी मास्टर याच्या विरोधात हैदराबाद रायदुर्गम पोलीस स्थानकात झीरो एफआयआर दाखल केला होता. 21 वर्षीय महिला तरुणीने त्याच्याविरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. जानी मास्टर याने अनेकदा आपला लैंगिक छळ केला आहे, असा आरोप तरुणीने केला होता. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री 2’ सिनेमातील गाण्याच्या कोरिओग्राफीसाठी जानी मास्टर चर्चेत आहे.
तक्रारदारानुसार, गेल्या काही महिन्यांपासून जानी मास्टरसोबत काम करत होती. आऊटडोअर शुटींगच्यादरम्यान जानीने तिला मारहाण केली. तिच्या तक्रारीनंतर एक झीरो एफआयआर करण्यात आला आणि हे प्रकरण नरसिंगी पोलिसांकडे सोपविण्यात आले. जानी मास्टर याच्यावर लैंगिक छळ, धमकी आणि जाणीवपूर्वक दुखापत करण्यासाठी आयपीसीच्या विविध कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जानी मास्टर याने साऊथसोबत हिंदी सिनेमांमध्येही काम केले आहे. त्याने अल्लू अर्जुन, सलमान खान, रश्मीका मंदाना, तमन्ना भाटीया सहित अनेक कलाकारांसोबत काम केले आहे. जानी मास्टरने जय हो, राचा, पुष्पा मधील श्रीवल्ली गाणे, स्त्री 2 मधील आज की रात, ‘खेल खेल मे’ मधील ‘डू यू नो’ सहित अनेक गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले आहे.