कर्नाटकचे भाजप आमदार मुनीरत्न यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बेंगळुरूजवळील एका खासगी रिसॉर्टमध्ये घडल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, कथित छळ, जीवे मारण्याच्या धमक्या आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी मुनीरत्न आधीच तुरुंगात आहे. आता बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानं त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
एका पोलीस अधिकाऱ्यानं यासंदर्भात माहिती दिली आहे. बलात्कार पीडितेने बुधवारी रात्री आमदार आणि इतर सहा जणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची चौकशी सुरू असल्याचे सांगतानाच पोलीस अधिकाऱ्यानं माहिती दिली की, ‘आमदाराकडून बलात्कार, लैंगिक छळ, धाक दाखवणे, कट रचणे, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने हेतुपुरस्सर अपमान करणे अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’ पीटीआय वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे.
राजराजेश्वरी नगर विधानसभा मतदारसंघातील आमदार मुनीरत्न यांना एका कंत्राटदाराला धमकावल्याचा आणि त्याच्याविरुद्ध जातीवाचक अपशब्द वापरल्याच्या आरोपावरून अटक केल्यानंतर पोलीस कोठडीत पाठवण्यात आल्याच्या काही दिवसांतच नवीन तक्रार दाखल झाली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदाराविरुद्ध यापूर्वीचे दोन गुन्हे 13 सप्टेंबर रोजी बेंगळुरूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना कोलार येथून अटक करण्यात आली होती.
पहिल्या प्रकरणात जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती आणि मुनीरत्न यांच्यासह चार जणांची नावे एफआयआरमध्ये होती. दुसऱ्या प्रकरणात मुनीरत्न या कंत्राटदाराविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
कंत्राटदाराने पत्रकार परिषदेदरम्यान एक ऑडिओ क्लिप जारी केली होती, ज्यात मुनीरत्न यांनी लाचेसाठी दबाव टाकत त्रास दिल्याचा दावा करण्यात आला होता.