हार्डीलिया केमिकल कामगार युनियनच्या आठ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, सर्वसाधारण सभा झाल्याचे भासवून 10 लाख हडप केले,

वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्याचे खोटे भासवून युनियन फंडात असलेले 10 लाख रुपये परस्पर हडप केल्याचा कारनामा हार्डीलिया केमिकलमधील कामगार युनियनच्या आठ पदाधिकाऱ्यांनी केला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या कंपनीतील कामगारांनी केलेल्या तक्रारीनुसार तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही रक्कम बँकेतून काढण्यासाठी आरोपींनी केलेल्या ठरावामध्ये सूचक आणि अनुमोदकांची नावेही संबंधित कामगारांना न विचारताच टाकले असल्याचे उघडकीस आले आहे.

तुर्भे एमआयडीसीमध्ये असलेले हार्डीलिया केमिकल या कंपनीचे युनिट सध्या बंद झाले आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती दिलेली आहे. या निवृत्तीच्या हिशेबावरून गोंधळ सुरू असतानाच आता कामगार युनियनचा हा नवीन घोटाळा उघडकीस आला आहे. कामगार युनियनच्या आठ सदस्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्याचे भासवून युनियन फंडातील 10 लाख रुपये परस्पर हडप केले. त्यांनी या खोट्या सभेत या रकमेचा धनादेश युनियनचे अध्यक्ष प्रमोद ठाकूर यांच्या नावाने काढण्याचा ठराव केला. या ठरावासाठी ज्यांची अनुमोदक आणि सूचक म्हणून नावे घेण्यात आली आहे, त्यांना या प्रकाराची कोणतीही कल्पना नाही. याप्रकरणी कंपनीचे सेवानिवृत्त कर्मचारी अरविंद शेळके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तुर्भे पोलिसांनी युनियनचे जनरल सेक्रेटरी नारायण ठाकूर, अध्यक्ष प्रमोद ठाकूर, सहसचिव रवींद्र परांजपे, खजिनदार वैभव भोसले, विजय हजारे, उपाध्यक्ष राजाराम पाटील, सहसचिव भानुदास पाटील, उपाध्यक्ष प्रभाकर ठाकूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कंपनीच्या कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.