क्राइम सिरीज बघून त्याने सुपरवायझरचा गळा चिरला

घोडबंदर येथील इमारतीच्या एका सुरक्षारक्षकाने सुपरवायझरची गळा चिरून हत्या केली होती. या हत्याचे कारण पोलिसांच्या तपासात समोर आले असून आईवरून शिवी दिली म्हणून सुरक्षारक्षकाला राग आला. तसेच हत्या करण्यापूर्वी त्याने क्राइम सिरीज पाहिली अन् सुपरवायझरची हत्या केल्याची कबुली सुरक्षारक्षकाने पोलिसांना दिली.

दोन दिवसांपूर्वी एका इमारतीच्या टेरेसवर गळा चिरलेला मृतदेह आढळला होता. ही घटना समोर येताच ठाण्यात खळबळ उडाली होती. हत्या पाहून पोलीसदेखील अवाक झाले होते. दरम्यान, कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. काही संशयास्पद गोष्टी लक्षात आल्यानंतर तिथे कामाला असलेल्या सुरक्षारक्षक प्रसाद कदम याने सोमनाथ सदगीर याची हत्या केल्याचे तपासात समोर आले. आईवरून शिवी दिल्याचा राग प्रसादच्या मनात होता. प्रसादने सोमनाथचा काटा काढण्याचे ठरवले. यासाठी त्याने सोशल मीडियावरील क्राइम सिरीज पाहिल्या, कशा रीतीने हत्या केली जाते? हत्या केल्यानंतर कसे पळून जातात? हत्यार कुठे लपवता येतात? या सगळ्या गोष्टी त्याने सिरीजवर पाहिल्या आणि त्यानंतर प्रसादने ठरवून सोमनाथला टेरेसवर नेले आणि तिथे त्याने धारदार हत्याराने गळा चिरल्याची कबुली आरोपीने दिली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार जवळे यांनी दिली.