तिरुपतीला मिळणाऱ्या लाडूंच्या प्रसादात प्राण्यांची चरबी मिसळली जायची; चंद्राबाबू यांचा वायएसआर काँग्रेसवर गंभीर आरोप

आंध्र प्रदेशमधील तिरुमला पर्वतावर असणाऱ्या भगवान तिरुपती मंदिराला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. जगभरात या मंदिराची ख्याती असून इथे मिळणारा लाडूंचा प्रसाद भक्त मोठ्या चवीने खातात. मात्र याच लाडूंमध्ये वासएसआर काँग्रेस सरकारच्या काळामध्ये प्राण्यांची चरबी मिसळली जात होती असा गंभीर आरोप मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. चंद्राबाबू यांच्या या आरोपांमुळे खळबळ उडाली असून राजकारण चांगलेच तापले आहे.

जगन मोहन रेड्डी यांच्या कार्यकाळात राज्यात तिरुपती मंदिरात मिळणाऱ्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात होता. वायएसआर काँग्रेस सरकार शुद्ध तुपाऐवजी जनावरांच्या चरबीचा वापर करत होते, असा आरोप चंद्राबाबू यांनी केला आहे. बुधवारी एनडीएच्या आमदारांच्या बैठकीला संबोधित करताना चंद्राबाबू यांनी हा आरोप करत खळबळ उडवून दिली. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

मागच्या 5 वर्षाच्या काळात वायएसआर काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी तिरुमला मंदिराचे पावित्र्य भंग केले. त्यांनी भाविकांना दिल्या जाणाऱ्या अन्नदानमच्या (मोफत जेवण) गुणवत्तेतही फेरफार केला आणि शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर करत तिरुमलाचा लाडूही दुषित केला, असा आरोप चंद्राबाबू यांनी केला. मात्र आता आम्ही यासाठी शुद्ध तुपाचा वापर करत असून तिरुमला तिरुपती देवस्थानच्या पावित्र्याचे रक्षण करण्याचा प्रयत करत आहोत, असेही ते म्हणाले.

दरम्यान, जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसने चंद्राबाबू यांचे आरोप फेटाळले आहे. वायएसआर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार वाय.व्ही. सुब्बारेडी यांनी चंद्राबाबू यांच्यावरच आरोप करत त्यांनी तिरुपती मंदिराचे पावित्र्य धोक्यात आणल्याचा आरोप केला. चंद्राबाबू यांनी तिरुमलाचे पावित्र्य आणि कोट्यवधी हिंदूंच्या आस्थांना धक्का पोहोचवण्याचे काम केले आहे. तिरुमलाच्या प्रसादाबाबत केलेली टिप्पणी दुर्दैवी असून कोणतीही व्यक्ती अशा शब्दांचा वापर करणार नाही किंवा असे आरोपही लावणार नाही, असेही सुब्बारेड्डी यांनी आपल्या एक्स (आधीचे ट्विटर) पोस्टवर म्हटले.

राजकीय फायद्यासाठी चंद्राबाबू नायडू कोणत्याही थराला जाऊ शकतात, हे पुन्हा सिद्ध झाले आहे. भक्तांचा विश्वास दृढ करण्यासाठी मी माझ्या कुटुंबासह तिरुमला प्रसादासंबंधात देवासमोर शपथ घ्यायला तयार आहे. चंद्राबाबू नायडूही त्यांच्या कुटुंबासोबत अशी शपथ घेण्यास तयार आहेत का? असा सवालही सुब्बारेड्डी यांनी केला आहे.