एसटी-कारची समोरासमोर धडक; 45 विद्यार्थी बालबाल बचावले

bus-accident

पाली-खोपोली राज्य महामार्गावरील दापोडे गावाजवळ मंगळवारी एसटीचा पाटा तुटल्याने बस आणि कारची समोरासमोर धडक झाली. त्यानंतर एसटी शेतात पलटी झाली. मात्र दैव बलवत्तर म्हणून एसटीतील 45 विद्यार्थी बचावले. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील दोघेजण जखमी झाले. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूककोंडी झाली होती.

एसटीचालक आयुष गायकवाड हे कर्जत आगाराची बस घेऊन पालीहून खोपोलीच्या दिशेने जात होते. ही बस दापोडेजवळ पोहोचली असता एसटीचा पाटा तुटला आणि स्टेअरिंग लॉक झाले. एसटी समोरून येणाऱ्या कारवर धडकून शेतात उलटली. एसटीतून 45 एनसीसीचे विद्यार्थी प्रवास करत होते. हे विद्यार्थी लोणेरे येथे कॅम्पसाठी जात होते. हे सर्व विद्यार्थी बालबाल बचावले, तर कारचा सीट बेल्ट व एअर बॅग उघडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कारचालकाच्या हाताला दुखापत झाली आणि दुसऱ्याच्या डोक्याला मार लागला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर विद्यार्थ्यांना पर्यायी बसने लोणेरे येथे रवाना केले.