वरळीत बेदरकारपणे कार चालवून निष्पाप महिलेचा बळी घेणाऱ्या मिहीर शहाची तुरुंगातून लवकर बाहेर पडण्याची शक्यता धुसर बनली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या कावेरी नाखवा यांचे पती प्रदीप नाखवा यांनी बुधवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्यातर्फे अॅड. रवी प्रकाश जाधव यांनी मिहीरच्या याचिकेत हस्तक्षेप करण्यासाठी न्यायालयाला विनंती केली. त्यांची विनंती मान्य करीत न्यायालयाने सोमवारी पुढील सुनावणी निश्चित केली.
मिहीर हा मिंधे गटाचा उपनेता राजेश शहाचा मुलगा आहे. त्याने 7 जुलैला दारूच्या नशेत बीएमडब्ल्यू कार बेदरकारपणे चालवली आणि वरळी परिसरात नाखवा दाम्पत्याला जोरदार धडक दिली. त्यात कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी फरार झालेल्या मिहीरला 9 जुलैला अटक करण्यात आली.
पोलिसांनी बेकायदा ताब्यात घेतल्याचे म्हणणे मांडत मिहीर शहा व सहआरोपी राजऋषी बिडावतने दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत. त्यावर बुधवारी न्यायमूर्ती भारती डांगरे व न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.