जरांगेंची फडणवीसांना तीन दिवसांची मुदत, राजकीय करियर उद्ध्वस्त करण्याचा इशारा

‘मी कोणतेही राजकीय भाष्य करत नाही. पण आम्हाला राजकीय भाषा वापरण्यास भाग पाडू नका. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी लवकर मान्य करा, नाटक करू नका… नसता राजकीय करियर खल्लास करीन!’ असा स्पष्ट इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. दरम्यान, अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण, नायब तहसीलदार महेंद्र गिरगे तसेच तलाठी विजय जोगदंड यांनी जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली, परंतु ती त्यांनी धुडकावून लावली.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सहाव्यांदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. 16 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून जरांगे यांचे उपोषण सुरू झाले आहे. आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. वर्षभरापासून आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. पण फडणवीसांचे ऐकून सरकार मराठ्यांना मूर्ख बनवत आहे. मराठा आरक्षण बिनबोभाट लागू करा, आता कोणतेही नाटक चालणार नाही. नसता सगळा खेळ खल्लास करीन. विधानसभा निवडणुकीत पाडापाडी झाली तर आम्हाला बोल लावायचा नाही, असे जरांगे म्हणाले.

सध्या उपसरपंचच कारभार करतोय

सध्या सरपंचाच्या हातात काहीच नाही. उपसरपंचाचीच चलती आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतील तसा कारभार चालू आहे. पण मराठा आरक्षणात खोडा घालण्याचा प्रयत्न करू नका, विधानसभेत प्रचंड महागात पडेल, असा इशारा यावेळी मनोज जरांगे यांनी दिला.