महाराष्ट्रातील सणासुदीच्या काळात ध्वनिप्रदूषण आणि लेझर किरणांचा अनियंत्रित वापर रोखण्यासाठीच्या अ.भा. ग्राहक पंचायतने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
राज्यात ‘गणेशोत्सव’सारखे सण समाप्त झाले आहेत. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने या मुद्द्यावरील निकालाचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दाखल करण्याची परवानगी आधीच दिली आहे, असे सुप्रीम कोर्टाने मंगळवारी ही याचिका फेटाळून लावताना सांगितले.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जेबी पार्डीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ‘अखिल भारतीय ग्राहक पंचायत’ने धार्मिक उत्सवांसह सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये लेझर बीम आणि लाऊडस्पीकरच्या वापराचे नियमन करण्याचे निर्देश मागणाऱ्या याचिकेवर सुनावणीची मागणी केली होती. खंडपीठाने सांगितले की, या निर्देशांबद्दल याचिकाकर्ता असमाधानी असल्यास ते सर्वोच्च न्यायालयात पुन्हा दाद मागू शकतील.
20 एप्रिल रोजी दिले होते हायकोर्टाने आदेश
उच्च न्यायालयाने 20 एप्रिल रोजी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये लेझर बीम आणि लाऊडस्पीकरचा अनियंत्रित वापर रोखण्यासाठी निर्देश मागणारी जनहित याचिका निकाली काढली होती. या त्रासामुळे पीडित लोक संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्प साधू शकतात, असे त्या वेळी हायकोर्टाने म्हटले होते.