आशियाई करंडकावर हिंदुस्थानचीच सत्ता, अपराजित, नॉनस्टॉप विजयासह पाचवे जेतेपद

आशियाई अजिंक्यपद करंडकावर हिंदुस्थानी हॉकी संघाचीच सत्ता दिसली आणि संघानेच सत्ताही राखली. अखंड स्पर्धेत अपराजित राहत सलग सात नॉनस्टॉप विजय ठोकताना हिंदुस्थानने यजमान चीनविरुद्ध अंतिम लढतीत 1-0 असा विजय नोंदविला आणि आपल्या पाचव्या आशियाई अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केले. हिंदुस्थानने आतापर्यंत 2011, 2014, 2018, 2021 आणि 2024 अशा पाच वर्षांत जेतेपदाला गवसणी घातली आहे.

गतविजेता हिंदुस्थानी संघ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंपून आशियाई अजिंक्यपद करंडकाचा संभाव्य विजेताही होता. 2021 मध्ये झालेल्या स्पर्धेतही हिंदुस्थाननेच बाजी मारली होती. त्यामुळे या स्पर्धेतही हिंदुस्थानच सर्वात पुढे होता. ऑलिम्पिक पदक राखून जोशात असलेला हरमनप्रीत सिंगचा संघ या स्पर्धेतही जेतेपद राखण्याच्या ध्येयानेच मैदानात उतरला होता.

चीनने झुंजवले

सहा सामन्यांत हिंदुस्थानसमोर पुणाचा निभाव लागला नव्हता, पण अंतिम सामन्यात चीनने आम्हाला झुंजवले. त्यामुळे सामना अत्यंत तणावपूर्ण स्थितीत खेळला गेला. चीन ज्या पद्धतीने खेळला, त्यांच्याविरुद्ध गोल ठोकणे सोप्पे नव्हते. मात्र आमच्या खेळाडूंनी एकमेकांवर विश्वास दाखवला आणि आम्ही काहीही  करण्यासाठी नेहमीच सज्ज असल्याचे सिद्ध केले. गेल्या वर्षी चेन्नईत आशियाई अजिंक्यपद करंडकात सुवर्ण, हांगझाऊ आशियाई स्पर्धेत सुवर्ण आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकल्यामुळे आमच्या संघात एक जिद्द निर्माण झाली आहे. त्याच जिद्दीने आम्ही जिंकलो, असे कर्णधार हरमनप्रीत विजयानंतर म्हणाला.

गोलांमध्येही हरमनची सत्ता

आशियाई करंडकात सर्वाधिक 9 गोल चीनच्या जी-हून यांगने केले असले तरी हिंदुस्थानी कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर पाच आणि दोन मैदानी गोल ठोकले. तसेच उत्तम सिंह, अरईजीत सिंह, सुखजीत सिंह, राजकुमार पाल या चौघांनीही प्रत्येकी तीन-तीन गोल ठोकत आपली कामगिरी चोख बजावली.

सर्वांची उडवली धुळधाण

हिंदुस्थानने आपले विजय अभियान चीनविरुद्धच सुरू केले आणि पहिल्याच सामन्यात यजमानांचा त्यांनी 3-0 ने फडशा पाडला होता. हिंदुस्थानच्या आक्रमकांसमोर चीनच्या बचावफळीचे काहीएक चालले नाही, मात्र त्यांनी जेतेपदाच्या लढतीत हिंदुस्थानला कडवी झुंज दिली. हाच असा सामना होता की, हिंदुस्थानने 2 पेक्षा कमी गोल केले. चीनचा 3-0 ने पराभव केल्यानंतर जपानचा 5-1 ने फडशा पाडला. दक्षिण कोरियाचा 3-1 ने नमवले तर मलेशियाची 8-1 अशी धुळधाण उडवली. पाकिस्तानला हरवताना हिंदुस्थानने 2-1 असे यश संपादले. सलग 5 सामने जिंकत उपांत्य फेरीत धडक मारणाऱ्या हिंदुस्थानने दक्षिण कोरियाला 4-1 असे सळो की पळो करून सोडले. विजयाचा उत्तुंग षटकार ठोकत अंतिम फेरी गाठल्यामुळे हिंदुस्थानकडून मोठ्या विजयाची अपेक्षा होती. त्यातच चीनलाही आपले पहिलेवहिले जेतेपद जिंकायचे होते. साखळीत हिंदुस्थानकडून हार सहन करावी लागली असती तरी त्यांनी अंतिम फेरीत भन्नाट खेळ केला. पूर्ण स्पर्धेवर वर्चस्व गाजवणाऱ्या हिंदुस्थानच्या आक्रमकांना पहिल्या तीन सत्रांत एकही गोल करता आला नाही. चीनला गोलांचे खाते उघडता आले नसले तरी त्यांच्या बचावफळीने हिंदुस्थानी खेळाडूंना रोखत आपली ताकद दाखवली. अखेर सामन्याच्या शेवटच्या सत्रात जुगराजने एक दुर्लभ आणि अमूल्य असा गोल केला आणि संघाच्या जेतेपदावर आपले नाव कोरले. त्याआधी तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण कोरियाचा 5-2 ने सहज पराभव केला आणि तिसरे स्थान पटकावले.