जगभरातील महत्वाच्या घडामोडी

जुन्या आयफोनसाठी आयओएस 18 अपडेट

टेक कंपनी अ‍ॅपलने आयफोन 16 सीरीज लॉच केल्यानंतर आपल्या आयफोन यूजर्ससाठी सर्वात मोठी ऑपरेटिंग सिस्टम 18 ला रोलआऊट केले. आयओएस 18 सोबत कस्टमाइजेबल होम स्क्रीन, अपडेट फोटोज अ‍ॅप आणि सफारी इन्हान्समेंटसारखे अपडेट आहेत. आयफोन 15, आयफोन 15 प्लस, आयफोन 15 प्रो, आयफोन 15 प्रो मॅक्स, आयफोन 14, आयफोन 14 प्लस, आयफोन 14 प्लस प्रो, आयफोन 14 प्रो मॅक्स, आयफोन 13, आयफोन 13 मिनी, आयफोन 13 प्रो, आयफोन 13 प्रो मॅक्स, आयफोन 12, आयफोन 12 प्रो, आयफोन 12 प्रो मॅक्स, आयफोन 11, आयफोन 11 प्रो, आयफोन 11 प्रो मॅक्स, आयफोन एसई (सेकंड जनरेशन), आयफोन एसई (थर्ड जनरेशन) या फोनला आयओएस 18 अपडेट मिळणार आहे.

शेअर बाजार कोसळला

भारतीय शेअर बाजार बुधवारी मोठ्या प्रमाणात कोसळला. सेन्सेक्स 131 अंकांनी खाली येऊन 82,948.23 वर बंद झाला तर निफ्टी निर्देशांक 25,400 च्या खाली उतरला होता. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेच्या व्याज दर कपातीच्या निर्णयाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागल्यामुळे बाजारात गुंतवणूकदारांना 3 लाख कोटींचा फटका आज बसला. अनेक समभागांचे मूल्य आज खाली आले होते. बीएसईचे मिडकॅप आणि स्मॉलकॅप दोन्ही निर्देशांकही पन्नास टक्क्यांहून खाली येऊन बंद झाले.

वैद्यकीय अभ्यासक्रमाची दुसरी प्रवेशफेरी 26 सप्टेंबरपासून

नवी दिल्लीतील वैद्यकीय समुपदेशन समितीकडून वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाची प्रवेश फेरी राबविण्यासंदर्भातील वेळापत्रक जाहीर केले जाते. त्यानुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून करण्यात येते. वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाची पहिली प्रवेश फेरी 5 सप्टेंबर रोजी संपली. या फेरीमध्ये रिक्त राहिलेल्या जागांवरील प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीतील प्रवेशाला 26 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. दरम्यान, 1 ऑक्टोबरपासून वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे.

मुंबई आयआयटीला विद्यार्थ्यांची पसंती

जेईई परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईला (आयआयटी मुंबई) पसंती दिली आहे. जेईई परिक्षेत पहिल्या 10 क्रमांकात असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबईची निवड केली आहे. पहिल्या 25 मधील 23 विद्यार्थ्यांनी तर पहिल्या 50 मधील 47 विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबईची निवड केली आहे. पहिल्या 75 पैकी 66 विद्यार्थ्यांनी तर 100 पैकी 72 विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबईला पसंती दिली आहे.

27 सप्टेंबरपासून अ‍ॅमेझॉनचा सेल

अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2024 च्या सेलची अखेर घोषणा करण्यात आली. अ‍ॅमेझॉनचा फेस्टिव्हल सेल 27 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. टीजरनुसार, या सेलमध्ये स्मार्टफोन्स, लॅपटॉप, फॅशनसह अन्य अ‍ॅक्सेसरीजवर मोठी सूट मिळणार आहे.

कोकण रेल्वेमध्ये 190 जागांसाठी भरती

कोकण रेल्वेमध्ये 190 जागांसाठी भरती करण्यात येत आहे. उमेदवार यासाठी 6 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतात. कोकणात राहणाऱ्या ज्या उमेदवारांची जमीन केआरसीएल प्रकल्पांसाठी संपादित करण्यात आली आहे तेच उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

सोने 222 तर चांदी 369 रुपयांनी स्वस्त

सराफा बाजारात बुधवारी सोन्याच्या भावात 222 रुपयांची तर चांदीच्या दरात 369 रुपयांची घसरण झाली. 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,505 रुपये प्रति तोळा झाला आहे. 22 कॅरेट सोने 66,996 रुपये प्रति ग्रॅमवर पोहोचले आहे. सोने आणि चांदीचे दर हे ‘आयबीजेए’ने जाहीर केले आहेत.

पंजाबमधील मुलीचा कॅनडामध्ये मृत्यू

पंजाबमधील तरुणीचा कॅनडात संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. अनु मलरा (24) असे मृत तरुणीचे नाव आहे. अनु जवळपास चार वर्षांपूर्वी कॅनडामध्ये अभ्यासासाठी गेली होती. शिक्षणानंतर ती आता वर्क परमिटवर कॅनडात काम करत होती.

सुनीता विल्यम्सचा अंतराळात ‘बर्थ डे’

हिंदुस्थानी वंशाच्या अमेरिकी अंतराळवीर सुनीता विल्यम्स दुसऱ्यांदा अंतराळात आपला वाढदिवस साजरा करणार आहेत. उद्या 19 सप्टेंबरला सुनीता आपला 59 वा जन्मदिवस साजरा करेल. याआधीही एकदा सुनीता यांनी अंतराळात बर्थ डे साजरा केला होता.

पाकिस्तानात गाढवांना आले ‘अच्छे दिन’

पाकिस्तानात गाढवांना फारच मागणी आहे. मागणी जास्त असल्याने गाढवांच्या किमतीही फारच वाढल्या आहेत. एका गाढवाची किंमत 3 लाख रुपये एवढी पोचली आहे. चीनमध्ये औषधे आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये गाढवाच्या कातडीचा वापर केला जातो. यामुळेच चीन पाकिस्तानातून जास्त प्रमाणात गाढवं मागवत आहे. गाढवांच्या किमती लाखो पार गेल्याने स्थानिक लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. विशेष करून गाडी जुंपून चरितार्थ चालवणाऱ्या लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. पूर्वी 8 ते 12 हजारांना मिळणारी गाढवं आता थेट 30 ते 35 हजारांना विकली जात आहेत.

हिंदुस्थानातील डायमंड उद्योग संकटात

हिंदुस्थानमधील डायमंड सेक्टर (हिऱ्याचा उद्योग) संकटात सापडला आहे. गेल्या तीन वर्षांत आयात आणि निर्यातीमध्ये मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे कारखाने बंद पडत असून शेकडो लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागत आहेत. ‘थिंक टँक ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशियटिव्ह’ (टीजीआरआय) ने बुधवारी ही माहिती दिली. वाढती स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातून कमी ऑर्डर मिळत असल्यामुळे हिंदुस्थानातील डायमंड उद्योग संकटात सापडला आहे, असे या अहवालात म्हटले आहे. 2021-22 मध्ये कच्च्या हिऱ्याचे आयात 18.5 बिलियन अमेरिकी डॉलर होते ते आता 2023-24 मध्ये 14 बिलियन डॉलरपर्यंत घसरले आहे. म्हणजेच यात 24.5 टक्के घसरण झाली आहे. कट आणि पॉलिश केलेल्या हिऱ्याची निर्यातसुद्धा 34.6 बिलियन डॉलरहून घसरून 2024 मध्ये 13.1 बिलियन डॉलर झाली आहे.

आयआयटी मुंबईला 130 कोटींची देणगी

मोतीलाल ओसवाल फाऊंडेशनने आयआयटी मुंबईला 130 कोटी रुपये देणगी देण्याची घोषणा नुकतीच केली. आयआयटीसारख्या संस्थांना मजबूत करण्याच्या उद्देशाने मोतीलाल ओसवालने हा निर्णय घेतला आहे. या देणगीतून मोतीलाल ओसवाल नॉलेज सेंटरची स्थापना आयआयटी मुंबई करेल. याआधी कंपनीचे प्रमोटर मोतीलाल ओसवाल आणि रामदेव अग्रवाल यांनी आपले 5-5 टक्के इक्विटी शेअर दान करण्याची घोषणा केली होती. दोघांचे मिळून 10 टक्के इक्विटी शेअर होतात आणि त्याची किंमत चार हजार कोटी रुपये होते. ही रक्कम पुढील दहा वर्षांत दान दिली जाईल. त्यातील 130 कोटी आयआयटी मुंबई संस्थेला देणगी स्वरूपात दिले जाईल.