कैलास पर्वताच्या दर्शनासाठी हेलिकॉप्टरची सुविधा

कैलास पर्वताच्या दर्शनासाठी उत्सुक असलेल्या भाविकांना आता पुढील आठवड्यापासून कैलास पर्वताचे दर्शन हेलिकॉप्टरने करता येणार आहे. याची अधिकृत घोषणा येत्या दोन ते तीन दिवसांत केली जाणार आहे. उत्तराखंडच्या पिथौरागड जिह्यातील जुन्या लिपुलेखच्या टेकड्यांवरून एमआय-17 हेलिकॉप्टरने कैलास पर्वताच्या दर्शनासाठी जाता येणार असून या प्रवासासाठी 75 हजार रुपये खर्च येणार आहे.

व्ह्यू पॉइंटची उंची 14 हजार फुटांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे हेलिकॉप्टरने प्रवास करण्याची मुभा फक्त 55 वर्षांपर्यंतच्या व्यक्तींनाच असणार आहे. आधीच्या प्रवास खर्चाच्या तुलनेत हा प्रवास खर्च निम्मा आहे. आधी दीड लाख रुपये ते अडीच लाख रुपयांपर्यंत खर्च येत होता. हिंदुस्थानातील भाविक तीन मार्गांनी कैलास पर्वतावर पोहोचू शकत होते.

पहिला-नेपाळ, दुसरा-जुना लिपुलेख आणि तिसरा-सिक्कीम. या मार्गांवरील प्रवास 11 ते 22 दिवसांत पूर्ण केला जात होता, परंतु कोरोनानंतर चीनने हे तिन्ही मार्ग बंद केले. त्यामुळे हिंदुस्थान सरकारने लिपुलेखच्या डोंगरावरून कैलास दर्शनाचा मार्ग शोधला. पिथौरागढ येथून यात्रेला सुरुवात होईल. येथून, लष्कराचे एमआय-17 हेलिकॉप्टर एकावेळी 15 भाविकांना जुन्या लिपुलेखच्या आधी 30 किमी अंतरावर असलेल्या गुंजी गावात घेऊन जाईल.

खर्च किती

हेलिकॉप्टरची उड्डाणे सकाळी 6 वाजल्यापासून सुरू होतील आणि सर्व भाविकांना दुपारी 2 वाजेपर्यंत गुंजी गावात परत आणतील. या दौऱ्याचे पॅकेज चार दिवस असून यासाठी 75 हजार रुपये प्रत्येक व्यक्तीला खर्च करावे लागतील.

कसे मिळेल दर्शन

प्रवाशाला धारचुला पिथौरागढपासून 11 किमी येथे आरोग्य तपासणी करावी लागेल त्यानंतर परमिट दिले जाईल. पहिल्या दिवशी पिथौरागढहून हेलिकॉप्टरने गुंजी गावात पोहोचू. रात्र इथेच काढावी लागेल. दुसऱ्या दिवशी गाडीने आदी कैलास दर्शनासाठी जॉलिंगकाँगला जावे लागेल. संध्याकाळी गुंजीला परत येऊन रात्रीचा मुक्काम असेल. तिसऱ्या दिवशी भाविक कैलास व्ह्यू पॉइंटवर परत येतील. तिसऱ्या दिवसाची रात्र गुंजीत घालवावी लागेल.