भाजप नेतृत्वाने राहुल गांधीविरोधातली प्रक्षोभक विधानं नाही थांबवली नाही, तर…; काँग्रेसचा इशारा

भाजप आणि मित्रपक्षाच्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात धमकीची भाषा केली होती. त्यावरून सत्ताधारी पक्षाने माफी मागावी आणि विषय संपवावा अशी मागणी काँग्रेस नेते के.सी.वेणुगोपाल यांनी केली आहे. तसेच भाजपने राहुल गांधी यांच्याविरोधातली प्रक्षोभक विधानं नाही थांबवली तर त्यांना रस्त्यावरही फिरू देणार नाही असा इशाराही वेणुगोपाल यांनी दिला.

भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी राहुल गांधींनी दहशतवादी म्हटलं होतं. तर मिंधे गटाच्या संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटण्याची भाषा केली होती. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते चिंता व्यक्त करत आहेत अशी माहिती काँग्रेस नेते के. सी वेणुगोपाल यांनी दिली. वेणुगोपाल म्हणाले की राहुल गांधी यांनी जेव्हापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली आहे, तेव्हापासून भाजपची संपूर्ण इकोसिस्टम राहुल गांधी यांच्यावर तुटून पडली आहे, त्यांच्यावर वैयक्तिक हल्ले केले आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून जे आम्ही पाहतोय त्यामुळे आम्ही दुःखी झालो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यावर काय भूमिका घेत आहेत याची आम्ही वाट बघतोय. राजकीय जीवनात मतभेद असतात, पण अशा प्रकारे जिवे मारण्याची धमकी कधी कुणाला दिली नव्हती. सत्ताधारी पक्षाने याबाबत माफी मागावी आणि विषय संपवावा. पण यात काहीतरी मोठा कट रचला जातोय. राहुल गांधी यांची देशात लोकप्रियता वाढत आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल गांधीसाठी जीवही द्यायला तयार आहेत. भाजपच्या नेत्यांनी राहुल गांधींविरोधातली प्रक्षोभक विधानं जर थांबवली नाही तर त्यांना रस्त्यावरही फिरू देणार नाही असा इशाराही वेणुगोपाल यांनी दिला आहे.