
गडचिरोली जिल्ह्यात दोन भावंडांचा मृत्यू झाल्यानंतर आई-वडिलांना मृतदेह खांद्यावर घेऊन 15 किलोमीटर पायपीट करावी लागल्याची घटना ताजी असतानाच भामरागड तालुक्यात संतापजनक घटना समोर आली आहे. एका डॉक्टरला शासकीय रुग्णवाहिकेतून चक्क दारूची वाहतूक करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडल्याने आरोग्य वर्तुळात खळबळ उडाली आहे.
ब्रम्हानंद रैनू पुंगाटी (29) रा. बारसेवाडा ता. एटापल्ली असे त्या डॉक्टरचे नाव आहे. नक्षलप्रभावित व आदिवासीबहुल पिपली बुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्रात तो कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. पहाटे हालेवारा पोलिस मवेली हालेवारा पिपली बुर्गी या मार्गावर नाकाबंदी करत होते. यावेळी ही रुग्णवाहिका तेथून जात होती. रुग्णवाहिका असल्याने पोलिसांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले, पण चालकाने गाडी सुसाट नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी पाठलाग करत रुग्णवाहिका थांबवून तपासणी केली असता आत देशी दारूचे 10 बॉक्स व विदेशी दारूच्या 96 बाटल्या आढळल्या, डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास करीत आहे, काँग्रेस ने या प्रकरणातील डॉक्टरवर कठोर कारवाई करत निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे.