दापोली तालुक्यात गरम पाण्याच्या कुंडासाठी प्रसिद्ध असलेल्या उन्हवरे गावातील गरम पाण्याच्या कुंडा जवळून वावघर भडवळे मार्गे खेडकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्यामध्ये महाकाय खड्डा पडला आहे. त्यामुळे येथील वाहतूक धोक्याची झाली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याची सुधारणा करण्याऐवजी याकडे कानाडोळा करत आहे.
दापोली तालुक्यात एकमेव गरम पाण्याचे कुंड हे उन्हवरे गावात आहे. गरम पाण्याचे कुंड असल्याने या गावात पर्यटक खुप मोठ्या संख्येने येथे येत असतात तसे उन्हवरे परिसरातील वावघर भडवळे मार्गे खेड तालुक्यात जाणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने या मार्गाचे वाहतुकीच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे असे असतानाही उन्हवरे वावघर रस्त्यावर नेमके उन्हवरे येथील गरम पाण्याच्या कुंडाजवळ रस्त्यावर पडलेल्या महाकाय खड्ड्यांमुळे वाहतूक धोक्याची झाली आहे.
कायम सजग असलेल्या लोकप्रतिनिधींना ही महत्त्वाची समस्या सोडविण्यासाठी आलेले अपयश हे त्यांच्या सजगतेचे लक्षण म्हणावे की गतिमान सरकारचे कृतिशील प्रशासन म्हणावे हे मात्र हा रस्ता आणि रस्त्यातील खड्डे पाहिल्यावर आपल्या लक्षात येते. ही समस्या सोडवून हा मार्ग वाहतूक योग्य करणे हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम आहे. ते काम सार्वजनिक बांधकाम विभागाने प्राधान्य क्रमांकांने हाती घेऊन ही समस्या निकाली काढून या मार्गावरील वाहतूक सुरळीतपणे आणि विना अपघात होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत अशी मागणी होत आहेत.