ICC ची ऐतिहासिक घोषणा, वर्ल्ड कपमध्ये महिला खेळाडूंना मिळणार पुरुषांच्या समान बक्षिसाची रक्कम

International Cricket Council (ICC) ने आज (17 सप्टेंबर) ऐतिहासिक घोषणा करत पुरुष आणि महिला क्रिकेटमधील भेदभाव नष्ट करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. या घोषणेअंतर्गत आता महिला आणि पुरुष खेळाडूंना विश्वचषकामध्ये बक्षि‍साची समान रक्कम देण्यात येणार आहे.

आयसीसीने एक निवेदन जाहीर करत या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, महिला टी-20 वर्ल्ड कप विजेत्यांना 2.34 दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे 20 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. पुढील महिन्यात 3 ऑक्टोबर पासून UAE मध्ये सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषकापासून या निर्णयाची अंमलबजावनी करण्यात येणार आहे. ही पहिली अशी आयसीसीची स्पर्धा असेल ज्या स्पर्धेत महिलांना पुरुषांच्या समान बक्षि‍साची रक्कम देण्यात येणार आहे.

जुलै 2023 मध्ये पार पडलेल्या आयसीसीच्या वार्षिक परिषदेमध्ये हा ऐतिहासिक निर्णया संदर्भात घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार 2030 साली बक्षि‍साची रक्कम समान करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता सात वर्षांपूर्वीच बक्षीस रक्कम समान करण्याचा ऐतिहासिक निर्णय आयसीसीने जाहीर केला आहे. त्यामुळे क्रिकेट हा पहिला असा खेळ बनला आहे ज्यामध्ये विश्वचषकाची बक्षीस रक्कम पुरुष आणि महिला खेळाडूंसाठी समान असणार आहे.