गेल्या दोन महिन्यांपासून अंतराळात अडकलेली हिंदुस्थानी वंशाची अमेरीकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स हिच्या पृथ्वीवर येण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. नासाने सुनिता विलियम्स आणि तिचा सहकारी बुच विल्मोर दोघंही 2025 मध्ये पृथ्वीवर येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांना आणण्यासाठी SpaceX चे ड्रॅगन क्रू कॅप्सूल पाठवण्यात येणार आहे.
सुनिता विलियम्स आणि तिचा सहकारी बुच विल्मोर दोघंही 25 फेब्रुवारी 2025 रोजी ते पृथ्वीवर परत येतील. सुनिता आणि बुच विल्मोर यांना परत आणणाऱ्या मिशनचे नाव Crew-9 असे आहे. याचे लाँचिग4 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे. या दोन अंतराळविरांना आणण्यासाठी जे SpaceX चे ड्रॅगन क्रू कॅप्सूल पाठवण्यात येणार आहे. या कॅप्सूलमध्ये एकावेळी सात अंतराळवीरांची बसण्याची व्यवस्था आहे. या कॅप्सूलचे वजन 7700 किलो आहे. त्याची वजन क्षमता 12,500 किलो आहे. SpaceX ने याचे अनेक प्रकार बनवले आहेत. आतापर्यंत 12 ड्रॅगन कॅप्सूल बनवण्यात आल्या असून यात 6 क्रू, 3 कार्गो आणि 3 प्रोटोटाइप कॅप्सूलचा समावेश आहे.
ड्रॅगन क्रू कॅप्सूलची उंची 15 फूट आहे. कॅप्सूलच्या आतील बाजूस 13 फूट व्यास आणि 12 फूट रुंदी आहे. सध्या एकूण 8 ड्रॅगन कॅप्सूल कार्यरत आहेत. त्यापैकी चार क्रू कॅप्सूल आहेत, म्हणजे अंतराळवीरांना अंतराळ स्थानकावर नेण्यासाठी आणि त्यांना परत आणण्यासाठी याचा वापर होतो. तर तीन कार्गो कॅप्सूलचा वापर सामानासाठी केला जातो. या कॅप्सूलचे पहिले उड्डाण 2 मार्च 2019 रोजी झाले. तर पहिले कार्गो उड्डाण 6 डिसेंबर 2020 रोजी झाले.
अंतराळविरांना आणण्यासाठी जे SpaceX चे ड्रॅगन क्रू कॅप्सूल पाठवण्यात येणार आहे यामध्ये चार अंतराळवीर पाठवण्यात येणार होते. मात्र यात आता बदल करण्यात आला आहे. या कॅप्सूलमधून फक्त दोन अंतराळविरांना पाठवले जाईल. जेणेकरून सुनिता आणि बुच विल्मोर यांना घेऊन येता येईल. पूर्वीच्या योजनेत, या मोहिमेची कमांडर जेना कार्डमन ही होती. पायलट निक हेग, मिशन स्पेशालिस्ट स्टेफनी विल्सन आणि रशियन कॉस्मोनॉट मिशन स्पेशलिस्ट अलेक्झांडर गोर्बुनोव्ह हे जहाजावर होते. पण आता यात फक्त दोन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव आणि पायलट निक हेग जाणार आहेत.