कॅडबरी जंक्शन येथे नव्याने उभारण्यात आलेल्या रेमंडच्या संकुलातील गार्डन असलेल्या भूखंडावर ठाणे महापालिकेने मुख्यालय उभारण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी गार्डनच्या या भूखंडावर रेमंडवासीयांची तहान भागवण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाकीलाच महापालिकेने स्थगिती दिली आहे. याविरोधात संकुलातील दहा हजार रहिवासी आक्रमक झाले आहेत. विकासकाने गार्डन असल्याचे प्लॅनमध्ये दाखवल्यानेच आम्ही या संकुलात जागा घेतली. त्यामुळे फसवणूक करून महापालिका या गार्डनच्या भूखंडावरील झाडे तोडून मुख्यालय उभारणार असेल तर आम्ही ते होऊ देणार नाही. गार्डनमधून ऑक्सिजनद्वारे मिळणारा श्वास आणि टाकीचे बांधकाम रोखून पाणी तोडण्याचे षडयंत्र हाणून पाडू, असा इशारा रेमंडवासीयांनी दिल्याने संघर्ष चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
ठाण्यातील रेमंड टेनएक्स हॅबिटॅट प्रकल्पातील रहिवाशांनी ठाणे महापालिकेविरोधात लढा सुरू केला आहे. रेमंडने पालिकेला गार्डनसाठी दिलेल्या भूखंडाचे आरक्षण बदलून प्रशासनाने मुख्यालय उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांची फसवणूक झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. रहिवाशांनी प्रस्तावित जमीन वापरातील बदल आणि महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांवरील काम थांबवण्याच्या आदेशाला विरोध केला असून न्यायालयात जाण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.
टेनएक्स हॅबिटॅट कॉम्प्लेक्स, पोखरण रोड क्रमांक 2, गांधीनगर आणि इतर टॉवर्सच्या परिसरासाठी 25 लाख लिटर पाण्याची टाकी बांधण्यात येणार होती. मात्र ठाणे महापालिकेच्या नगर अभियंत्याने स्टॉप बर्क ऑर्डर काढल्यामुळे रहिवाशांच्या चिंतेत भर पडली आहे. रेमंड रियल्टीच्या परिसरातील 25 हजार कुटुंबीय वास्तव्य करणार असून पाणीपुरवठ्यावर आधीच ताण जाणवत असताना बांधकाम थांबल्यामुळे पाणीटंचाईची भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
भूखंडावरील बदलेले आरक्षण, पाण्याच्या टाकीला मिळालेल्या स्टॉप वर्क ऑर्डरला आमचा आक्षेप असून आम्ही थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन दिले आहे. आम्हाला हक्काच्या जागेपासून वंचित राहावे लागेल. आम्हाला न सांगता हा निर्णय घेण्यात आला असून आम्ही न्यायालयीन लढाई लढणार आहोत. या जागेत नव्या मुख्यालयाला आमचा कायम विरोध राहील,
• राजेश तावडे (स्थानिक रहिवासी, टेनएक्स)
म्हणूनच नव्या इमारतीची गरज…
शहराची लोकसंख्या 20 लाखांच्या वर पोहोचली असून नगरसेवकांची संख्याही 131 झाली आहे. सध्या ठाणे पालिकेचा कारभार पाचपाखाडी येथे 38 वर्षे जुन्या इमारतीतून सुरू असून मुख्यालयाची इमारत जीर्ण झाली आहे. तसेच कामाचा व कागदपत्रांचा व्याप वाढल्याने नस्ती ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे नव्या इमारतीचा विचार करण्यात येत आहे.