पोटच्या मुलीनेच दिली आईची सुपारी, धक्कादायक कारण आले समोर

नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. नवी मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. मोबाईल वापरण्यावर निर्बंध आणल्यामुळे एका मुलीने तिच्या जन्मदात्या आईची हत्या केली आहे. या प्रकरणी मुलीसह एकाला अटक करण्यात आली आहे. प्रिया नाईक असे मृत आईचे नाव आहे.

प्रणिता पाटील आणि निशांत पांडे अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. प्रणिता हिचा विवाह झाला होता. मात्र नवऱ्यासोबत भांडण झाल्याने ती आईकडे पनवेलला आली होती. दोन वर्षांपासून ती तिच्या पाच वर्षांच्या मुलीसोबत आईकडे राहत होती. त्यावेळी तिचे एका तरुणासोबत सुत जुळले. मात्र तिची आई तिला फोनवर बोलण्यास नेहमी निर्बंध टाकत होती. तिच्यावर मोबाईलवर सतत तपासणी करायची. या सगळ्याला कंटाळून तिने एकदिवस आईचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.

प्रणिताने तिचा मानलेला भाऊ विवेक पाटील याला पैशांची गरज होती. तिने त्याला 10 हजार रूपयांचे आमिष दाखवत आईला संपविण्याबाबत सांगितले. तोही त्यासाठी तयार झाला. मग विवेकने निशांत पांडे याच्या मदतीने 13 सप्टेंबर रोजी प्रिया नाईक यांची राहत्या घरात हत्या केली. प्रिया यांचे पती प्रल्हाद घरी आल्यानंतर त्यांना प्रिया बेशुद्धावस्थेत सापडल्या. त्यांना तत्काळ रूग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता त्यांचा गळा आवळून हत्या झाल्याचे समोर आले. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. पोलिसांनी प्रिया पाटील हिची चौकशी केली. त्यानंतर विवेक पाटील आणि निशांत पांडे यांनी प्रिया यांची हत्या केल्याचे समोर आले.