धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास उग्र स्वरूपाच आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देत अजित पवार गटाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी सरकारला एक प्रकारे घरचा आहेर दिला आहे. सरकारने आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
राज्यामध्ये सध्या मराठा, धनगर, मुस्लिम अशा विविध समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. त्यातच धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलन सुरू आहे. मात्र आता सरकारमध्ये सत्तेत असणाऱ्या अजित पवार गटाच्या आमदारांनीच याला विरोध सुरू केला आहे. धनगरांना एसटी प्रवर्गातून आरक्षण दिलं तर सरकारच्या विरोधातच उग्र स्वरूपाचा आंदोलन केले जाईल, असा इशारा अकोले येथील आमदार लहामटे यांनी दिला आहे.
लहामटे म्हणाले की, ‘धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा ज्यांनी कोणी निर्णय घेतला, त्याचा मी निषेध करतो. आदिवासी समाजाला घटनात्मक आरक्षण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले आहे. त्यामध्ये 47 जमातींना आरक्षण देण्यात आले आहे. त्यात कोणाचाही समावेश होऊ शकत नाही. त्यामुळे घटनेची कोणीही पायमल्ली करू नये. धनगर समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर स्वतंत्र द्या. धनगर आणि आदिवासी समाजाचा काही संबध नाही, त्यांची संस्कृती स्वतंत्र आहे. त्यामुळे सरकार असा का विचार करतयं? किंवा काही संघटनांना का वाटतय आदिवासी समाजात आरक्षण मिळावं? असा प्रश्नही लहामटे यांनी उपस्थित केला. ‘सरकारने आदिवासी समाजाला कायदा हातात घ्यायला लावू नये. धरणासाठी जमीनी आम्ही दिल्या. शोषण आमच झालय. घटनेने आम्हाला जे आरक्षण दिलं आहे, त्यावर जर इतरांचा डोळा असेल तर ते चालणार नाही, असे म्हणत लहामटे यांनी सरकारला एक प्रकारे ताकीद दिली आहे.