
दिल्लीत एक अनोखी घटना समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या चाळीस दिवसानंतर एका महिलेने न्यायालयात धाव घेत घटस्फोटासाठी याचिका दाखल केली आहे. नवरा महिन्यातून केवळ दोनदाच आंघोळ करतो असा महिलेचा आरोप आहे.
महिलेने आगरा येथील एका काऊंसलिंग सेंटरकडे यासाठी मदत मागितली. महिलेच्या म्हणण्यानुसार, ती अशा व्यक्तीसोबत राहू शकत नाही जो स्वत:ची स्वच्छता ठेवत नाही. दोन्ही पक्षांमध्ये सलोखा बनविण्यासाठी समुपदेशकांनी महिलेच्या पतीशी संपर्क साधला, मात्र त्याचे उत्तर ऐकून सर्वच थक्क झाले.
महिलेच्या पतीच्या म्हणण्यानुसार, तो महिन्यातून केवळ दोनदा आंघोळ करतो आणि महिन्यातून एकदा शरीरावर गंगाजल शिंपडतो. मात्र मागच्या महिन्यात सहा वेळा त्याने आंघोळ केली होती कारण पत्नी सातत्याने दुर्गंध येत असल्याची तक्रार करत होती.
लग्नाच्या दोन आठवड्यानंतर याच गोष्टींवरुन दोघांमध्ये वाद सुरु होता. त्यानंतर वैतागून महिला आपल्या घरी निघून गेली. त्यानंतर महिलेच्या नातेवाईकांनी हुंड्याची मागणी केल्याचा आरोप पोलीस तक्रार केली आहे. त्यानंतर महिलेने घटस्फोटासाठी याचिका दाखल केली आहे.