पिठाची गिरणी चालवणाऱ्याची मुलगी ययाती बनली क्रिकेट टिमची कॅप्टन

डहाणूच्या चिखले गावातील पिठाची गिरणी चालवणारे शैलेंद्र गावड यांची कन्या ययाती गावड हिची मुंबई क्रिकेट असोसिएशनने 19 वर्षांखालील महिला क्रिकेट संघाच्या सराव सामन्यात कॅप्टन म्हणून निवड झाली आहे. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी ययाती हिने यशस्वीपणे जी खडतर कामगिरी पार पाडली आहे. तिच्या यशाने पालघरवासीयांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

डहाणू तालुक्यातील चिखले हे ययातीचे गाव असून तिचे इयत्ता पहिले ते आठवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण तिने येथेच पूर्ण केले. माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी ती बोर्डीला गेली. डहाणूमधील एका शिबिराला आली असता तिच्यातील क्रिकेटचे गुण प्रशिक्षक महेश पाटील यांनी टिपले आणि क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. ययाती एकीकडे मैदान गाजवत असतानाच दुसरीकडे ती गुणवत्तेची शिखरे गाठत होती. दहावीत तिला 92 टक्के गुण मिळले. गेल्या एक वर्षापासून महिलांच्या 19 वर्षांखालील गटात ती क्रिकेट खेळत आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत ती 40 सामने खेळली आहे. 19 वर्षांखालील महिलांच्या मुंबई क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व तिने केले आहे. ऑलराऊंडर खेळाडू म्हणून तिची ओळख आहे.