इशानचे लवकरच पुनरागमन, बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेत संधीची शक्यता

देशांतर्गत क्रिकेटमध्ये न खेळल्यामुळे कठोर शिक्षा भोगलेल्या इशान किशनला लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे द्वार उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या दुलीप ट्रॉफीत झंझावाती शतक ठोकत इशानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दार ठोठावले आहे. परिणामतः इशानची राष्ट्रीय निवड समितीला लवकरच दखल घ्यावी लागणार असल्याचे समोर आले आहे.

दुलीप ट्रॉफीत जोरदार शतक ठोकल्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी इशानच्या नावाचीही चर्चा सुरू झाली. त्याच्या शतकामुळे निवड समितीही काहीशी अडचणीत आल्याचे दिसत आहे. एकीकडे ऋषभ पंत पुनरागमनासाठी तयार होत असताना ध्रुव जुरेल आणि केएल राहुलला संघात कसे खेळवायचे हा प्रश्नही त्यांच्यासमोर उभा ठाकला असताना अचानक इशानचेही नाव चर्चेत आले आहे.

आगामी काळात हिंदुस्थानचे आंतरराष्ट्रीय शेड्युल खूप व्यस्त असल्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी हिंदुस्थानी संघात सर्व पर्यायांची चाचपणी करण्यासाठी निवड समिती सरसावली आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इशानला संधी मिळाली तर सर्वांना आश्चर्य वाटेल, पण त्याला टी-20 मालिकेत संधी देण्याचा विचार समोर आला आहे. गेले वर्षभर इशानला एकाही आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळवण्यात आलेले नाही. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत शुबमन गिल आणि ऋषभ पंत यांना विश्रांती देत इशानचा पत्ता वापरला जाण्याची तयारी केली जात आहे.

येत्या 7 ते 13 ऑक्टोबरदरम्यान तीन टी-20 सामने खेळले जाणार आहेत. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला प्रारंभ होईल. ही मालिका 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्यामुळे केवळ 3 दिवसांचीच विश्रांती आहे. यादरम्यान पंत आणि गिलला विश्रांती देत इशानवरील आपला राग कमी झाल्याचे निवड समिती दाखवू शकते. या मालिकेत बुमरा आणि सिराजलाही थोडासा आराम देत नव्या गोलंदाजांना आजमावण्याचा विचार आहे. त्यामुळे ही टी-20 मालिका नव्या दमाच्या खेळाडूंसह खेळविण्याची तयारी आतापासून केली जात आहे.