मुंबईकरांमुळे हिंदुस्थान ‘अ’ चा मोठा विजय

शम्स मुलानी आणि तनुष कोटियन या मुंबईकर फिरकीने हिंदुस्थान ‘ड’चा दुसरा डाव 301 धावांत गुंडाळून हिंदुस्थान ‘अ’ संघाला 186 धावांनी दुलीप ट्रॉफी स्पर्धेत दणदणीत विजय मिळवून दिला. पहिल्या सामन्यात पराभूत झालेल्या ‘अ’ संघाने दुसरा सामना जिंकत आपले जेतेपदाचे स्वप्न कायम राखले आहे.

आता तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात जो संघ निर्णायक विजय नोंदवेल त्यालाच दुलीप ट्रॉफीवर आपले नाव कोरता येईल. आता सलग दोन पराभवांमुळे जेतेपदाच्या लढतीतून हिंदुस्थान ‘ड’ संघ बाहेर फेकला गेला आहे. पहिल्या डावात 89 धावांची दणकेबाज खेळी आणि सामन्यात 4 विकेट घेणारा शम्स मुलानी ‘सामनावीर’ ठरला.

हिंदुस्थान ‘अ’ संघाने 290 धावसंख्या उभारल्यानंतर हिंदुस्थान ‘ड’ संघाला 183 धावांवर रोखून पहिल्या डावात 107 धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर हिंदुस्थान ‘अ’ संघाने दुसऱया डावात 3 बाद 380 धावसंख्या उभारून हिंदुस्थान ‘ड’ संघाला विजयासाठी 488 धावांचे कठीण लक्ष्य दिले होते. मात्र, त्यांचा डाव 80.2 षटकांत 301 धावांवरच संपुष्टात आल्याने हिंदुस्थान ‘अ’ संघाला 186 धावांनी मोठा विजय मिळाला.

दरम्यान, हिंदुस्थान ‘ड’ संघाने तिसऱ्या दिवसाच्या 1 बाद 62 धावसंख्येवरून रविवारी सकाळी पुढे खेळायला सुरुवात केली. यश दुबे (37) व निकी भुई (113) यांनी दुसऱ्या विकेटसाठी शंभर धावांची भागीदारी करीत चांगला प्रतिकार केला होता. मात्र, दुबे बाद झाल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरल्याने हिंदुस्थान ‘ड’ संघाला हा कसोटी सामना वाचविता आला नाही. देवदत्त पडिक्कल (1), कर्णधार श्रेयस अय्यर (41) व संजू सॅमसन (40) या स्टार फलंदाजांपैकी कोणीही शेवटपर्यंत खेळपट्टीवर उभे राहू शकले नाही. त्यातच निकी भुईही सातव्या फलंदाजाच्या रूपाने बाद झाला. त्याने 195 चेंडूंत 14 चौकार व 3 षटकारांसह 113 धावांची खेळी केली. त्यानंतर सौरभ कुमार (22) व हर्षित राणा (24) यांनी काही काळ हिंदुस्थान ‘ड’ संघाचा पराभव लांबविला. शेवटी 80.2 षटकांत 301 धावांवर त्यांचा डाव गारद झाला.

मुलानीची दखल घेतली जाणार

दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात हिंदुस्थान अ संघाला ब संघाकडून 76 धावांनी मात खावी लागली होती. मात्र दुसऱ्या सामन्यात अ संघाला शम्स मुलानीने आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर 186 धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला. शंभरीतच अर्धा संघ गारद झाला असताना शम्सने 89 धावांची खणखणीत खेळी करत हिंदुस्थान अ संघाला 290 धावांपर्यंत नेले. त्यानंतर 488 धावांचा पाठलाग करणाऱ्या हिंदुस्थान ब संघाच्या देवदत्त पडिक्कल, श्रेयस अय्यर यांचे त्रिफळे उडवत मुलानीने अ संघाचा विजय निश्चित केला.

मुलानीने 117 धावांत महत्त्वाचे 3 विकेट टिपले. त्यामुळे पहिल्या सामन्यात हरलेल्या संघाला दुसऱ्या सामन्यात मोठा विजय नोंदविता आला. पहिल्या डावात 89 धावा ठोकणाऱ्या शम्सने सामन्यात 167 धावांत 4 विकेट घेत आपली अष्टपैलू चमक दाखवली. तसेच तो गेली दोन वर्षे रणजी स्पर्धेतही जोरदार कामगिरी करतोय. पण अद्याप त्याच्या कामगिरीची राष्ट्रीय निवड समितीला दखल घ्यावीशी वाटली नाही. मात्र दुलीप ट्रॉफीमधील या कामगिरीची कोणत्याही स्थितीत दखल घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आगामी मालिकांमध्ये शम्सची निवड करणे, हे निवड समितीपुढे मोठे आव्हान ठरणार आहे.

‘ब’ आणि ‘क’ यांच्यातील सामना अनिर्णित

बंगळुरू – हिंदुस्थान ‘क’ आणि हिंदुस्थान ‘ब’ या संघांतील दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेतील चौथा सामना अनिर्णितावस्थेत संपला. मात्र, हिंदुस्थान ‘क’ संघाने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर तीन गुणांची कमाई केली, तर ‘ब’ संघाला एका गुणावर समाधान मानावे लागले. पहिल्या डावात 8 बळी टिपून हिंदुस्थान ‘ब’ संघाचा डाव संपविण्यात मोलाची भूमिका बजावणारा अंशुल कंबोज या विजयाचा शिल्पकार ठरला.

हिंदुस्थान ‘क’ संघाने पहिल्या डावात 525 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरादाखल हिंदुस्थान ‘ब’ संघाला 108 षटकांत 332 धावसंख्येपर्यंत मजल मारता आल्याने‘क’ संघाला 193 धावांची आघाडी मिळाली. मात्र, या दोन डावांतच तीन दिवसांचा खेळ संपल्यामुळे ही कसोटी अनिर्णित राहणार हे स्पष्ट झाले होते.

हिंदुस्थान ‘ब’ संघाने तिसऱ्या दिवसाच्या 7 बाद 309 धावसंख्येवरून पुढे खेळताना 332 धावांपर्यंत उर्वरित तीन फलंदाज गमावले. त्यानंतर हिंदुस्थान ‘क’ संघाने दुसऱ्या डावात 37 षटकांत 4 बाद 128 धावा केल्यानंतर उभय संघांच्या कर्णधारांनी कसोटी अनिर्णित ठेवण्याचा निर्णय घेतला.