हिंदुस्थानी संघात पुनरागमनासाठी मी अथक मेहनत घेतोय; पण आता मला कोणताही धोका पत्करायचा नाहीय, अशी प्रतिक्रिया वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने व्यक्त केलीय. गेल्या वर्षी वन डे वर्ल्ड कपदरम्यान झालेल्या दुखापतीनंतर शमीने शस्त्रक्रियेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूरच आहे. मात्र गेले दोन महिने तो बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनरागमनासाठी मेहनत घेतोय.
आता तो पूर्णपणे तंदुरुस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्याच्या दुखापतीत खूप सुधारणा झाली असून तो हळूहळू प्रगती करतोय. आता त्याच्या शस्त्रक्रियेच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या वेदना होत नसल्याचे त्यानेच सांगितलेय.
मी जेव्हा क्रिकेटमध्ये पुनरागमन करीन तेव्हा मला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये हाच माझा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे मी माझ्या फिटनेसबाबत कोणतीही घाई करत नाहीय. जोपर्यंत मी 100 टक्के फिट होत नाही तोपर्यंत मी कोणतीही जोखीम पत्करणार नाही. मी जितकी अधिक मेहनत करीन तितकाच मी आणखी मजबूत होईन.