बारमध्ये महिलांना आक्षेपार्ह नृत्य करण्यास सांगणे गुन्हा नाही, हायकोर्टाने रद्द केला एफआयआर

बारमध्ये महिलांना आक्षेपार्ह नृत्य करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्याचा गुन्हा उच्च न्यायालयाने रद्द केला. मितेश पुनिमाया असे गुन्हा रद्द झालेल्याचे नाव आहे. तब्बल आठ वर्षांनी हा गुन्हा रद्द झाल्याने मितेशला दिलासा मिळाला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी मितेशने केलेल्या याचिकेवर न्या. अजय गडकरी व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह गाणे म्हणणे किंवा कृत्य करणे यासाठी आयपीसी कलम 294 अंतर्गत गुन्हा नोंदवला जाऊ शकतो. मितशने तसे कोणतेही कृत्य सार्वजनिक ठिकाणी केलेले नाही. बारमध्ये महिलांना नाचण्यासाठी प्रवृत्त केले जात होते. मितेश तेथे कोणतेही आक्षेपार्ह कृत्य करताना सापडला नाही. तो तेथे महिलांवर नोटाही उडवत नव्हता, असे न्यायालयाने मितेशची याचिका मंजूर करताना नमूद केले.

काय आहे प्रकरण

18 फेब्रुवारी 2016 रोजी सी प्रिन्स बार अॅण्ड रेस्टॉरंटवर पोलिसांनी धाड टाकली. तेथे महिला आक्षेपार्ह नृत्य करत होत्या व कस्टमर त्यांच्यावर नोटा उडवत होते. कस्टमर महिलांना आक्षेपार्ह नृत्य करण्यास प्रवृत्त करत होते. तेथे मितेश महिलांचे आक्षेपार्ह नृत्य बघत होता, असा पोलिसांचा आरोप होता. त्यानुसार नागपाडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात आयपीसी कलम 294 सह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.

पोलिसांचा युक्तिवाद

बारमध्ये महिलांना आक्षेपार्ह नृत्य करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या ग्राहकांची यादी पोलिसांनी बनवली आहे. यामध्ये मितेशचे नाव आहे. तशी साक्ष धाड टाकणाऱ्या पथकातील पोलिसांनी दिली आहे. मितेशविरोधातील गुन्हा योग्यच आहे, असा युक्तिवाद पोलिसांनी केला.

याचिकाकर्त्याचा दावा

मी तेथे कोणतेही आक्षेपार्ह कृत्य करत नव्हतो. तसा कोणताही आरोप माझ्यावर नाही, असा दावा याचिकेत करत मितेश पुनिमाया याने आपल्या विरोधातील गुन्हा रद्द करण्याची मागणी केली होती.