म्हाडाच्या प्रतीक्षा नगर येथील संक्रमण शिबिराची दुरवस्था झाली असून इमारतीच्या आसपासचा परिसर खचला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने स्थानिक रहिवाशांसोबत म्हाडाच्या उपाध्यक्षांची भेट घेत येथील इमारतींचेही स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली आहे.
शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई यांच्या सूचनेनुसार माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी नुकतीच म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांची भेट घेत प्रतीक्षा नगर संक्रमण शिबिरातील रहिवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला.
संक्रमण शिबीर, एसआरडी व जुन्या इमारतींसोबत एलआयजी, एमआयजी व एचआयजी या इमारतींचेही स्ट्रक्चरल ऑडिट करावे तसेच टी – 36, 37, 53 आणि टी-54 या इमारतींना प्रथम प्राधान्य द्यावे, संक्रमण शिबिराच्या आसपासची जमीन खचत आहे. त्यासाठी आयआयटीचा फायनल रिपोर्ट लवकरात लवकर मागवून घेणे, स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये इमारत धोकादायक असल्याचे आढळल्यास प्रत्येक गाळेधारकाचे स्थलांतर प्रतीक्षा नगरमध्येच करावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. त्यावर इमारतीच्या आसपासच्या परिसराचे काँक्रीटीकरण करुन लवकरात लवकर तो पूर्ववत करून घ्या असे आदेश उपाध्यक्षांनी दिले.
संक्रमण शिबीर इमारतीतील गाळेधारकांनी भाडे सवलत अभय योजना मागणी केली असता म्हाडा उपाध्यक्ष यांनी तसा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीला उपविभागप्रमुख प्रभाकर भोगले, शाखाप्रमुख संजय म्हात्रे, संजय कदम यांच्यासह शाखेचे पदाधिकारी, स्थानिक रहिवाशी आणि म्हाडाचे अधिकारी उपस्थित होते.