घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या लाखो मुंबईकरांचे पोट भरणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांना घराचे आमिष दाखवत मुंबईबाहेर फेकण्याचा डाव मिंधे सरकारने आखला आहे, असा गंभीर आरोप मुंबई डबेवाला असोसिएशनने केला आहे. डबेवाल्यांना 25 लाखांत घर देण्याची घोषणा मिंधे सरकारने केली खरी, परंतु ही घरे मुंबईत नाही, तर ठाणे जिह्यातील भिवंडी येथे देण्यात येणार आहेत. डबेवाल्यांना मुंबईबाहेर फेकण्याचा हा प्रकार असल्याचे डबेवाला असोसिशनने म्हटले आहे.
भिवंडी तालुक्यातील दिवे अंजूर गाव येथे 46 एकर जागेत पंतप्रधान आवास योजने अंतर्गत 12 हजार घरे मंजूर करण्यात आली. या प्रकल्पासाठी लागणारी सर्व प्रक्रिया म्हाडामार्फत पूर्ण केली जाणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.
हा गृहप्रकल्प पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर उभारण्यात येणार असून डबेवाल्यांना 500 चौरस फुटांची 5 हजार घरे देण्यात येणार आहेत. तसेच त्यांची किंमत 25 लाख रुपये सांगण्यात आली आहे. मात्र महिना 15 ते 20 हजार रुपये उत्पन्न असणारा डबेवाला 25 लाख कुठून आणणार आणि बँकांनी कर्ज दिले तरी ते फेडणार कसे, असा सवाल मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केला आहे.
10 ते 12 लाखांत घरे द्या
25 लाख रुपये मुंबईचा डबेवाला देऊ शकत नाही. मात्र मुंबईबाहेरच घर द्यायचे असेल तर ते 10 ते 12 लाखांत द्यावे अशी मागणी मुंबई डबेवाला असोसिएशनने केली आहे. मुंबईत म्हाडा अल्प उत्पन्न गटात 25 लाखांत घर देते आहे, त्यासाठी लॉटरी काढत आहे आणि तिकडे डबेवाल्यांना दिवे-ांजूर येथे 25 लाखांत घर दिले जात आहे. मग डबेवाल्यांनाच 25 लाखांत अल्प उत्पन्न गटात सरकार मुंबईत घर देऊ शकत नाही का? डबेवाला यांचे उत्पन्न लक्षात घेता अल्प दरात म्हणजेच 10 ते 12 लाखांतच घरे द्यायला हवीत, असे मुंबई डबेवाला असोसिएशनने म्हटले आहे.