मुंबईकरांसाठी लोकलमधील गर्दी पाचवीलाच पुजली आहे. लोकलच्या डब्यात पाय ठेवायलाही जागा नसते. अक्षरशः तोंड वर काढून श्वास घ्यावा लागतो. पण आता लोकलमधील ही रेटारेटी कमी होणार आहे. कारण आता फेऱ्यांची संख्या वाढवणार असल्याचा दावा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला आहे. त्यामुळे आता दर तीन मिनिटांऐवजी अडीच मिनिटांनी लोकल मिळणार आहे.
तांत्रिक अडचणी दूर करत तीनही मार्गांवरील लोकलना कवच प्रणालीबरोबरच कंबाईन कम्युनिकेशन्स बेस्ड ट्रेन पंट्रोल यंत्रणा जोडली जाणार आहे. त्यामुळे दोन लोकलमधील वेळेचे अंतर 180 सेकंदवरून 150 सेपंदावर येणार आहे. अशा प्रकारची प्रणाली लाभणारे मुंबई हे पहिलेच शहर ठरणार आहे. या प्रणालीमुळे येत्या तीन वर्षांत लोकल फेऱ्यांची संख्या दुपटीने वाढणार आहे. रेल्वे मार्गावर कवच यंत्रणा बसविण्यात येत असून त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा दावा रेल्वे मंत्र्यांनी केला.
मुंबई उपनगरीय सेवांवर कवचसोबतच सीबीटीसी प्रणालीचे एकत्रीकरण करून ही नवी यंत्रणा बसवण्यात येईल. हा प्रयोग सर्वात आधी उपनगरीय रेल्वेवर करण्यात येणार असल्याने रेल्वे अपघात कमी होण्यासोबतच दोन गाड्यांमधील वेळ कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे उपनगरीय रेल्वे प्रवाशांना येत्या काही महिन्यांत अधिक वेळ ताटकळत स्थानकावर थांबावे लागणार नाही.
350 नवीन एसी लोकल
मुंबई उपनगरीय रेल्वेवर 350 नवीन एसी लोकल विकत घेण्यासाठी रेल्वेची निविदा तयार आहे. सध्या पश्चिम आणि मध्य उपनगरीय मार्गांवर रेल्वेच्या एपूण 14 एसी लोकल धावत आहेत. या लोकल प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आल्या होत्या. एसी लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा रेल्वे प्रशासनाचा दावा आहे. त्यामुळे भविष्यात अतिरिक्त एसी लोकल प्रवाशांना मिळण्याची शक्यता आहे.