नोकरीच्या देण्याच्या बहाण्याने तरुणीला हॉटेलमध्ये बोलावून जिम मालकाने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना जुहूमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही.
पीडित तरुणी मूळची उत्तर प्रदेशातील असून 2019 मध्ये तिची आरोपीशी ओळख झाली होती. यावेळी आरोपीने तिला आपण मुंबईत जिम सुरू करणार असल्याचे सांगितले. आरोपीने तरुणीला जिममध्ये चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार नोकरीच्या बहाण्याने आरोपीने तरुणीला मुंबईत बोलावले.
जुहूस्थित एका हॉटेलमध्ये बिझनेस मिटिंगच्या बहाण्याने तरुणीला बोलावून आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर गोवा आणि लखनऊमध्ये विविध ठिकाणी बोलावून तिच्यावर बलात्कार केला.
अखेर तरुणीने जुहू पोलीस ठाणे गाठत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. तरुणीच्या फिर्यादीवरुन जुहू पोलिसांनी जिम मालकाविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.