Kolkatta News- मुलाच्या उपचारासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग, आरोपी वॉर्ड बॉयला अटक

कोलकातातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे काही नावच घेत नाहीएत. आपल्या मुलाच्या उपचारांसाठी रुग्णालयात आलेल्या एका 26 वर्षाीय महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तसेच पुढील तपास सुरू केला आहे.

पीडित महिला ही कोलकात्यातील अलीपूर भागातील रहिवासी आहे. ती आपल्या मुलाच्या उपचारासाठी बाल आरोग्य संस्थेत आली होती. तेथे तिने मुलाला ॲडमिट केले होते. ॲडमिट केल्याच्या काही काळानंतर ती देखाील आपल्या मुलासोबत तेथेच झोपली होती. यावेळी तिच्या एकट्यापणाचा फायदा घेत तेथील एका नराधम वॉर्ड बॉयने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्याने पीडित महिलेला अयोग्यरित्या स्पर्श केला. यासोबतच तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला.

महिलेने आरोपी वॉर्ड बॉय तनय पाल याच्या विरोधात कराया पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वॉर्ड बॉयने आपल्याला अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. याचसोबत तिने आरोपीवर मोबाईलमध्ये तिचे चुकीचे व्हिडीओ देखील रेकॉर्ड केल्याचा आरोप केला आहे. पीडित महिलेच्या लेखी तक्रारीनंतर कराया पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी आरोपीविरुद्ध हिंदुस्थानी दंड संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर आरोपी तनय पाल याला अटक करण्यात आली. तसेच पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी केली जात आहे.