
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. वैजापूरमध्ये शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मिंधे आणि भाजपवर कडाडून हल्ला चढवला. भाजपला महाराष्ट्राची लूट करायची आहे, म्हणूनच त्यांना शिवसेना नको आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र, त्यांना हिंदुत्वाचा भगवा, महाराष्ट्रची ओळख पुसता येणार नाही, असेही त्यांनी ठणकावले.
महाराष्ट्रामध्ये सध्या सगळी थेरं चालू आहेत. नाटकाचे प्रयोग सुरु आहेत. सरकार आपल्या दारी, त्यानंतर मोठमोठ्या योजनांचे मोठमोठे कार्यक्रम सुरू आहेत आणि त्यासाठी पैसे देऊन माता भगिनींना, बांधवांना आणले जात आहे. एसट्या बुक केल्या जात आहेत. जेवणाखाण्याची चंगळ आहे. पण तसं इथे कोणालाही पैसे देऊन आणलेले नाही.
मी प्रत्येक वेळेला सभेमध्ये सांगतो की, त्यांच्याकडे सगळी भाडेखाऊ लोकं आहेत, पण इकडे माझ्या सभेला एकसुद्धा भाडेखाऊ लोकं नाहीत. कारण आम्हाला विकतचे काही नको आम्हाला आमच्या हक्काचे हवे आहे आणि आज मी इथे पुन्हा मशाल पेटवायला आलो आहे. मशाल. आज मला एका गोष्टीचा आनंद आहे की, शिवरायांचा भगवा हा डौलाने फडकतोय. कारण मध्यंतरी एक गोंधळ माजवण्याचा प्रयत्न केला होता ज्यांना मी गोमूत्रधारी हिंदूत्व म्हणतो त्यांना. हे कोण गोमूत्रधारी हिंदुवाले? बोगस जनता पार्टी म्हणजेच भाजप. हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे. आई भवानीचा भगवा आहे. हिंदूत्वाचा भगवा आहे. वारकऱ्यांचा भगवा आहे, साधूसंतांचा भगवा आहे आपल्या महाराष्ट्राचा हक्काचा अस्सल मराठमोळा भगवा आहे. मग या भगव्याला तोडायचे फोडायचे. मग कोणीतरी सुरूवात केली, मग त्याच्यावर त्यांचे चिन्ह टाकायला लागले. आपण आपले चिन्ह टाकायला लागलो. हाच तो भाजपचा डाव आहे की भगवा महाराष्ट्रातून पुसून टाकायचा. अरे तुमचे बापजादे उतरले तरी हा छत्रपतींचा भगवा, हिंदुत्वाचा भगवा तुम्हाला या महाराष्ट्रातून तुम्हाला पुसून टाकता येणार नाही. अजिबात नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा पण यांना शिवसेना का नकोय कारण यांना महाराष्ट्र लुटायचा आहे.
आता त्यांनी लाडकी बहिण योजना केली आहे. हरकत नाही. चांगली आहे. पण लाडकी बहिण म्हंटल्यावर तिला भाऊ कोण ते तरी दाखवा ना. हा म्हणतो मी भाऊ तो म्हणतो मी तुझा भाऊ . जनतेचा पैसा आणि हे सगळे फुकट खाऊ. पैसा जनतेचा यांनी त्यांच्या खिशातून काही काढलेले नाही. तुमच्या सर्व जनतेचा हक्काचा पैसा आहे तोच आपल्याला आपल्या घरामध्ये महिलांची मते घेण्यासाठी म्हणून ते घेत आहेत.