आशा बावणे राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित, चंद्रपुरात त्यांचे जोरदार स्वागत

आरोग्य क्षेत्रात नि:स्वार्थ वृत्तीने सेवा देणाऱ्या देशातील 15 परिचारकांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने नवी दिल्ली येथे गौरव करण्यात आला. यात महाराष्ट्रातून एकमेव मूळच्या चंद्रपूरकर व सध्या गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सहाय्यक अधिसेविका या पदावर कार्यरत आशा बावणे यांना त्यांच्या 28 वर्षांच्या आरोग्यसेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. एक लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. आशा बावणे 2019-20 या कोविड मध्ये सार्वजनिक आरोग्य परिचारिका सामान्य रुग्णालय चंद्रपूर या पदावर कार्यरत असताना आदिवासी दुर्गम विभागात डायरिया प्रकोप, हज यात्रा टीकाकरण, तसेच डायरियाची साथ सुरू असताना त्यामध्ये स्वतः प्राधान्याने गरीब आदिवासी लोकांवर उपचार सेविका म्हणून काम करून मृत्यूचे प्रमाण कमी केले. पुरस्कार मिळाल्यानंतर चंद्रपुरात आशा बावणे यांचे प्रथम आगमन झाल्याबद्दल त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. आपल्या या यशाचे श्रेय त्यांनी सहकारी व कुटुंबियांना दिले आहे.