सातारा शहरासह जिल्ह्यात विसर्जन मिरवणुकीवेळी लेजर बीम, बीम लाईट्ससह डोळ्यांना त्रासदायक ठरतील, अशा लाईट्स वापरायला बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी काढले असून, कोणीही त्याचा वापर केल्यास कठोर कारवाई करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सातारा शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सवाचा माहोल दिवसेंदिवस काढू लागला आहे. दुसरीकडे सहाव्या दिवसापासून विसर्जनालाही बहुतांशी ठिकाणी सुरुवात झाली आहे. अनंत चतुर्दशीला व त्याच्या आदल्या दिवशी सार्वजनिक गणपतीच्या विसर्जन मिरवणुका सर्वाधिक मोठ्या असतात. गेल्या काही वर्षांपासून झगमगाट करणाऱ्या व डोळ्यांना तीव्र स्वरूपाच्या जाणवतील अशा लाईट्सचा वापर विसर्जन मिरवणुकीत काढला आहे. कोल्हापूर येथे अशा लाईट्समुळे एका पोलिसासह अनेकांच्या डोळ्यांना हानी झाल्याने ‘सातारा जिल्हा अलर्ट’ झाला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत डोळ्यांना इजा होतील, अशा लाईट्सच्या वापरावर बंदी घातली. त्यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळे प्लाझ्मा, बीम लाईट्स आणि लेझर बीम लाईटचा वापर करतात. यामुळे अपघाताची शक्यता बळाकते. तसेच या लाईट्समुळे डोळ्यांनाही इजा होण्याचा धोका आहे. त्यामुळेच बंदी घालण्यात आली असून, याचा भंग करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.
साताऱ्याच्या गणेशोत्सवाला शांततेची व विधायकतेची परंपरा आहे. अनिष्ठ प्रथा या उत्सवातून हद्दपार होत असतात. लेझर बीममुळे डोळ्यांना इजा होण्याचा धोका असतो. त्यामुळे त्यावर प्रशासनाने बंदी घातली आहे. त्याचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.
स्थानिकांनी पर्यायी जागेत पार्किंग करावे
पार्किंगच्या व्यवस्थेबाबत गणेश विसर्जन मार्गावर राहणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने विसर्जन मार्ग सोडून पर्यायी जागेत पार्क करावीत. विसर्जन पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने तालीम संघाजवळील मैदान, गुरुवार परज, गांधी मैदान, कोटेश्वर मैदान या चार ठिकाणी अथका आपल्या पर्यायी जागेत पार्किंग करावीत, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.