Ganeshotsav 2024 – मुंबापुरीत भक्तीचा महापूर उसळला, सलग सुट्टय़ा आल्या…

गणपती दर्शनासाठी परळ, लालबाग, गिरगावसह अवघ्या मुंबईत भाविकांची गर्दी झाली आहे. उद्यापासून सलग सुट्टय़ा आल्याने गर्दीचा उच्चांक होणार आहे. शनिवाररविवारची सुट्टी आणि सोमवार वगळता मंगळवारी अनंत चतुर्दशी अशा सलग सुट्टय़ा आल्याने मुंबई शहर आणि उपनगरात सहकुटुंब गणेश दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा महापूर लोटला आहे.

महाराष्ट्रातील गणेशोत्सवाची जगात ख्याती आहे. त्यात मुंबईतील उंच गणपती आणि भव्य आरास प्रत्येकाचे आकर्षण ठरते. ते पाहण्यासाठी देशविदेशातील लोकांची गर्दी होते. गणेशोत्सवाच्या पहिल्या पाच दिवसांत गौरी-गणपतींच्या आगमनामुळे अनेकांना सार्वजनिक गणपती पाहण्यासाठी बाहेर पडता आले नव्हते. गौरी-गणपतीच्या विसर्जनानंतर मुंबई शहरात आणि उपनगरात भाविकांची गर्दी वाढली आहे.

लालबाग, चिंचपोकळी, काळाचौकी, परळ, दादर, माटुंगा, शीवसह मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील सार्वजनिक गणपती पाहण्यासाठी भाविकांची रीघ लागली आहे. लालबागमध्ये प्रचंड गर्दीमुळे पाय ठेवायलाही जागा नाही अशी परिस्थिती आहे. विशेषकरून सायंकाळच्या सुमारास भाविक सहकुटुंब गणपती पाहण्यासाठी निघतात. त्यामुळे गणपतींचा परिसर गर्दीने फुलून गेला आहे.

सोमवारी ईदची सुट्टी होती. परंतु ती मुस्लिम बांधवांच्या मागणीवरून बुधवारी देण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारची एक सुट्टी टाकली तर सलग पाच दिवस सुट्टी मिळत आहे. हे पाच दिवस अनेकांनी गणपती दर्शन आणि विसर्जन सोहळा पाहण्यासाठीच राखून ठेवले आहेत. गौरी-गणपतींच्या विसर्जनानंतर कोकणातील चाकरमानीही मुंबईत परतून या गर्दीचा भाग बनले आहेत.

गणेशभक्तांचे लोंढेच्या लोंढे लोकल गाडय़ांमध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करत मुंबईच्या दिशेने रवाना होताना दिसत आहेत. लालबागकडे जाणाऱ्या रस्त्यांवर तर गर्दीमुळे ट्रफिक जॅम झाले आहे. वाहतूक पोलिसांनी अनेक रस्ते एक दिशा मार्ग केले आहेत. वाहतुकीची काsंडी सोडवताना पोलिसांचीही दमछाक होत आहे.

n ‘लालबागचा राजा’, गणेशगल्लीतील ‘मुंबईचा राजा’, ‘तेजुकायातील मोरया’, ‘काळाचौकीचा महागणपती’, ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’, ‘परळचा राजा’, ‘माझगावचा मोरया’, जीएसबीचा श्रीमंत गणपती पाहण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. गिरगावातील 20 फुटांपेक्षा जास्त उंच गणेशमूर्ती पाहण्यासाठीही भक्तांचा ओढा वाढला आहे. उपनगरांमध्येही सांताक्रूझ, अंधेरी, बोरिवली, घाटकोपर येथील गणपतींकडे गर्दी होत आहे.

एका दिवसात मुंबईत पाच लाखांहून अधिक भाविकांनी घेतले बाप्पाचे दर्शन

वीकेण्डचा मुहूर्त साधत कुटुंबकबिल्यासह  पाच लाखांहून अधिक भाविकांनी शहरातील बाप्पांचे दर्शन घेतले. शुक्रवार रात्रीपासूनच लोकल, बेस्ट बसेस तसेच खासगी वाहनांनी भाविक लालबाग-परळसह गिरगावात आले होते. गिरगाव-गिरणगावात एकाच दिवसात तीन लाखांहून अधिक तर उपनगरात दोन लाखांहून अधिक भाविकांनी गणरायाचे दर्शन घेतले. मुंबईकरांसह राज्यातल्या विविध ठिकाणांहून भाविक दर्शनासाठी येत असल्याने लालबाग-परळ तसेच गिरगावात भक्तिमय  वातावरण निर्माण झाले आहे.