‘तुंबाड’ 6 वर्षांनंतर पुन्हा सिनेमागृहात
सहा वर्षांपूर्वी थिएटरवर धुमाकूळ घातलेला ‘तुंबाड’ हा चित्रपट शुक्रवारी पुन्हा एकदा सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 1.50 कोटी ते 1.75 कोटींचा गल्ला जमवला आहे. 2018 साली प्रदर्शित झालेल्या तुंबाडने प्रेक्षकांची मने जिंकली होती. प्रेक्षकांकडूनही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. प्रतिसाद पाहून ‘तुंबाड-2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे.
सोने 74 हजारपार चांदीही चमकली
देशात सोन्याचा भाव पुन्हा एकदा 74 हजार पार गेला आहे. शनिवारी सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याने 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,610 रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदी प्रतिकिलो 89,600 रुपयांवर पोहोचली आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 68,260 रुपये प्रतितोळा झाला आहे. तर 24 कॅरेट सोने 74,460 रुपयांवर पोहोचले आहे.
टीसीएसच्या 30 हजार कर्मचाऱ्यांना आयकर नोटीस
आयटी कंपनी टाटा कन्सल्टेंसी सर्व्हीसेजच्या (टीसीएस) जवळपास 30 हजार कर्मचाऱ्यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. ही नोटीस आर्थिक वर्ष 2023-24च्या चौथ्या तिमाहीत करण्यात आलेल्या टीडीएस कपातीसंबंधित आहे. या नोटिसीमध्ये 50 हजार ते 1.45 लाख रुपयांपर्यंतच्या टॅक्सची मागणी आहे.
‘आयफोन 16’ प्री-बुकिंगवर डिस्काऊंट ऑफर
आयफोन 16 सीरिजच्या लाँचिंगनंतर आता प्री-बुकिंगला सुरुवात झाली आहे. आयफोनच्या खरेदीवर अॅपलचा प्रीमियर पार्टनर इमॅजिन स्टोअर्सकडून डिस्काऊंट ऑफरची घोषणा करण्यात आली आहे. 19 सप्टेंबरपर्यंत आयफोनला प्री-बुक करता येऊ शकते. प्री-बुक करण्यासाठी केवळ 5 हजार रुपये द्यावे लागतील.
नोकरी! पंजाब ऍण्ड सिंध बँकेत 213 पदांसाठी भरती
पंजाब आणि सिंध बँकेत स्पेशालिस्ट ऑफिसरच्या 213 पदासाठी भरती केली जात आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर आहे. या पदांमध्ये ऑफिसर 56, मॅनेजर 117, सीनिअर मॅनेजर 33 आणि चीफ मॅनेजरच्या 7 पदांचा समावेश आहे. या पदांसाठी किमान वय 20 तर कमाल 40 असायला हवे.
संत्रा-मोसंबी उत्पादकांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या – सलील देशमुख
अतिवृष्टीमुळे विदर्भातील संत्रा व मोसंबीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचे पंचनामे करण्याचे काम सध्या सुरू असून विभागीय आयुक्तांमार्फत यासंदर्भातील अहवाल लवकरात लवकर शासनाला सादर करण्याच्या सूचना देऊन संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱयांना त्वरित मदत मिळवून देण्यात यावी. आर्थिक अडचणीत असलेल्या संत्रा व मोसंबी उत्पदकांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन देऊन केली आहे.
लैंगिक छळप्रकरणी नायरमधील सहयोगी प्राध्यापकाचे निलंबन
वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या नायर रुग्णालयातील सहयोगी प्राध्यापकाला पालिका प्रशासनाने निलंबित केले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी पालिका मुख्यालय स्तरावरील सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्र प्रमुख अंतर्गत तक्रार समितीकडे सोपवली आहे. या समितीकडून चौकशीची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर प्राप्त होणाऱया निष्कर्षानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सदर प्रकरणाची चौकशी पालिका मुख्यालय स्तरावरील ‘कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक समिती’कडे हस्तांतरित केली आहे.
अयोध्या राममंदिरातील कर्मचारी युवतीवर बलात्कार
अयोध्या येथील राममंदिर संकुलात काम करणाऱया युवतीवर ऑगस्टमध्ये तीन वेळा सामूहिक अत्याचार होऊनही असंवेदनशील पोलिसांमुळे तिला न्याय मिळत नसल्याचा दावा समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ‘एक्स’वर तिच्या निवेदनाचा व्हिडीओ शेअर केला. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. बीए शिकत असलेल्या या युवतीने केलेल्या तक्रारीत नऊ जणांवर बलात्काराचा आरोप केला होता.
कोलकाता बलात्कार प्रकरण माजी प्राचार्याला अटक
कोलकाता येथील आरजी कर कॉलेज आणि रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार व हत्येनंतर कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्यावरही रेप, हत्येचा आरोप ठेवून सीबीआयने आज अटक केली. या प्रकरणी सुरुवातीला तपास करणारे पोलिस अधिकारी अभिजित मुंडाळ यांनाही सीबीआयने अटक केली आहे. तपासकर्त्यांची दिशाभूल आणि पुरावे लपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दोघेही तपासाला विलंब आणि पुराव्यांमध्ये जाणूनबुजून फेरफार करत होते, असे सीबीआय तपासात समोर आले आहे. घोष याला आर्थिक अनियमितता प्रकरणात सीबीआयने आधीच अटक केली असून कोर्टाने 23 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे.
उपशहरप्रमुख तानाजी मालुसरे यांचे निधन
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे डोंबिवली उपशहरप्रमुख तानाजी मालुसरे यांचे गुरुवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांचे वय 62 होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भावंडे, चार बहिणी असा मोठा परिवार आहे. देवीचा पाडा येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, तात्यासाहेब माने, शहरप्रमुख अभिजित सावंत, प्रकाश तेलगोटे यांच्यासह विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांचे निधन
विविध सामाजिक आणि पत्रकार संघटनांच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रमांचा अखंड कार्यध्यास घेतलेले ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांचे वय 82 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दौलतनगर वैकुंठभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष, मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष अशी पदे भूषवलेले वैद्य एकता विनायक संस्थेचे उपनगरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मागाठाणे मित्र मंडळ, प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालय अशा विविध संस्थांचे संस्थापक, प्रमुख आधारस्तंभ होते. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार, मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य अत्रे पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते. त्यांच्या अंत्ययात्रेत पत्रकारांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.