व्याजाच्या पैशांसाठी रशियाने लावला, बांगलादेशच्या नव्या सरकारकडे तगादा

बांगलादेशला रुपपूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी दिलेल्या कर्जावरील व्याजासाठी रशियाने आता तगादा लावला आहे. मूळ रकमेवरील व्याज 630 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास 5 हजार 300 कोटी रुपये झाले आहे. हे व्याज 15 सप्टेंबरपर्यंत द्यावे, असे रशियाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. व्याजाचे पैसे मिळावेत यासाठी रशियन अधिकाऱ्यांनी मागील महिन्यात बांगलादेशच्या आर्थिक संबंध विभागाला (ईआरडी) पत्र पाठवले आहे. हे पत्र आता पत्रकारांपर्यंत पोहोचले आहे.

बांगलादेशने अमेरिकन डॉलर किंवा चिनी युआनमध्ये थकबाकी भरावी, असेही या पत्रात म्हटले आहे. शेख हसिना या पायउतार झाल्यानंतर पैसे भरण्याची जबाबदारी आता नव्या सरकारवर येऊन पडली आहे. 15 सप्टेंबरला रविवार आहे. चीनमध्ये पुढील दोन दिवस म्हणजे 16 आणि 17 सप्टेंबर रोजी बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे बांगलादेशच्या नव्या सरकारला कर्जाचे व्याज जमा करण्यासाठी 18 तारखेपर्यंत वेळ मिळणार आहे.

कर्ज फेडण्यासाठी वेळ द्या

बांगलादेशने रशियाकडे कर्ज परतफेडीमध्ये दोन वर्षांची सूट मागितली होती. बांगलादेशला मार्च 2029पासून कर्जाची परतफेड करायची होती. त्या वेळी तत्कालीन पंतप्रधान शेख हसिना यांच्या सरकारने पेमेंटच्या विलंबासाठी कोरोना, आर्थिक मंदी आणि इतर अनेक गोष्टींचा हवाला दिला होता. याशिवाय बांगलादेशने रशियाला बांगलादेशकडून वस्तू खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु नव्या पत्रात रशियाने कोणताही प्रस्ताव स्वीकारत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

4 टक्के व्याजाने कर्ज

रशियाने बांगलादेशला अणुऊर्जा प्रकल्पासाठी 12.65 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 1.06 लाख कोटी रुपये कर्ज रुपात दिले होते. या पैशावर रशियाकडून केवळ 4 टक्के व्याजदर लावण्यात आला आहे. रशियाने घातलेल्या अटींनुसार, पैशाचे व्याज देण्यास उशीर झाल्यास बांगलादेशला 2.4 टक्के जास्त म्हणजे 6.4 टक्के दराने व्याज द्यावे लागेल. व्याजासाठी 15 सप्टेंबर ही डेडलाईन आहे.

दरम्यान, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांना 5 ऑगस्ट रोजी तडकाफडकी राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर स्थापन झालेल्या मोहम्मद युनुस सरकारला हे पैसे भरावे लागणार आहेत.