पहिली ‘वंदे भारत मेट्रो’ मुंबईऐवजी भुजमधून धावणार, गुजरात प्रेम उतू चाललेय!

मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई, महाराष्ट्रातून मोठमोठे उद्योगधंदे पळवणाऱ्या केंद्र सरकारचे गुजरात प्रेम ओसंडून वाहत आहे. मुंबईसारख्या शहरात पहिली ‘वंदे भारत मेट्रो’ सुरू करण्याऐवजी गुजरातधार्जिन्या सरकारने पहिली मेट्रो ही गुजरातमधून सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

वंदे भारत मेट्रोच्या चाचण्या पूर्ण केल्या असून या ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या 16 सप्टेंबरला हिरवा झेंडा दाखवणार आहेत, अशी माहिती आता समोर आली आहे. ही मेट्रो 10 डब्यांची असणार आहे. ही मेट्रो पूर्णपणे अनारक्षित असेल. म्हणजेच प्रवाशांना ट्रेन सुटण्याआधी काउंटरवर जाऊन तिकीट खरेदी करता येईल. वंदे भारत मेट्रो ताशी 75 ते 90 कि.मी. प्रतितास वेगाने चालवली जाणार आहे.

पहिली मेट्रो भूज स्थानकावरून सकाळी 5.05 मिनिटानी सुटेल. ती 10 वाजून 50 मिनिटांनी अहमदाबादला पोहोचेल. 360 कि.मी.चे अंतर कापण्यासाठी या मेट्रोला 6 तास 45 मिनिटांचा वेळ लागेल.

भुज ते अहमदाबाद मार्गावर धावणार

पहिल्या वंदे भारत मेट्रोचे वेळापत्रक रेल्वेकडून जारी करण्यात आले आहे. ही ट्रेन भूज ते अहमदाबाद या मार्गावर धावणार आहे. आठवड्यातून 6 दिवस चालवली जाणार आहे. ही ट्रेन अंजार, गांधीधाम, उचाऊ, समखियाली, हलवद, ध्रांगध्रा, विरमगाम, चांदलोडिया, साबरमती या स्थानकांवर थांबेल. तर अहमदाबादहून निघालेली मेट्रो चांदलोडिया, विरमगाम, ध्रांगध्रा, हलवद, समखियाली, भचाऊ, गांधीधाम, अंजार मार्गे भूजला पोहोचेल.

तिकीट दर किती…

देशातील पहिल्या वंदे भारत मेट्रोचे तिकीट हे स्वस्तात मिळणार असून त्याची किंमत 30 रुपये असणार आहे. 50 किलोमीटरसाठी 60 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. प्रवाशांना सात दिवस, पंधरा दिवस आणि मासिक पास काढता येईल. मेल एक्सप्रेस, साधी ट्रेन, पॅसेंजरचे तिकीट मेट्रोत ग्राह्य धरले जाणार नाही.