नायर रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेल्या सहकारी प्राध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे. महानगरपालिका मुख्यालय स्तरावरील सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्र प्रमुख अंतर्गत तक्रार समितीकडे या प्रकरणाची चौकशी सोपवण्यात आली आहे.
नायर रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीने सहकारी प्राध्यापकावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला. याबाबत तिने तक्रारही दाखल केली. विद्यार्थिनीच्या तक्रारीची दखल घेत रुग्णालयातील लैंगिक छळ प्रतिबंधक समितीने प्रकरणाची चौकशीही केली. तसेच कार्यस्थळी महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंध प्रमुख अंतर्गत तक्रार समिती व सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्र समिती यांनीदेखील प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यालय स्तरावरील चौकशी समितीच्या निष्कर्षानुसार पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.