Tumbbad 2 – तुंबाडचा दुसरा पार्ट येणार, सिक्वेल की प्रिक्वेल? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

तुंबाड नुकताच थिएटरमध्ये री रीलीज झाला आहे. प्रेक्षकांनी हा चित्रपट इतका डोक्यावर घेतला आहे की एका दिवसांत तुंबाडने दीड कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट संपताना चाहत्यांना एक गुड न्युज मिळाली आहे. ती म्हणजे तुंबाडचा दुसरा भाग येणार आहे.

अभिनेता आणि निर्माता सोहम शहाने ही अधिकृत घोषणा केली आहे. तुंबाड संपताना एक डायलॉग ऐकवला जात आहे. त्यात जे काही असेल ते परत येणार आहे असे म्हटले जात आहे. सोहम शाहने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करून तुंबाड २ ची अधिकृत घोषणा केली आहे.

सिक्वेल की प्रिक्वेल?

तुंबाड २ ची घोषणा झाली असली तरी हा सिक्वेल असणार आहे की प्रिक्वेल हे अजून कळालेले नाही. कारण चित्रपटाच्या शेवटी हस्तर आणि विनायक मरतात. विनायकचा मुलगा पांडुरंग विहिरीचे दारही बंद करून निघून जातो. तुंबाडच्या सिक्वेलपेक्षा प्रिक्वेल होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण विनायकच्या पुर्वजांनी हस्तरला नेमकं इथे आणलं कसं? देवीचा गर्भ त्यांना सापडला कसा? विनायकाच्या पुर्वजांकडे एवढं सोनं आणि संपत्ती असताना त्यांच्या घराण्याला उतरती कळा कशी लागली? विनायकच्या आजीला हस्तर कसा शिवला? विनायकाचे वडील कोण होते? अशी बरीच प्रश्न अनुत्तरित राहिली आहेत. त्यामुळे प्रिक्वेलमध्ये या प्रश्नांची उत्तरं मिळतील का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.